भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 09:05 IST2025-12-20T09:05:13+5:302025-12-20T09:05:34+5:30
भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्ग परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
मीरा रोड : भाईंदर पूर्वेच्या तलाव मार्ग परिसरात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. एका इमारतीत जिन्यातून पहिल्या मजल्यावर पोहोचलेला बिबट्या दरवाजा उघडा पाहून घरात शिरला आणि अडकला. वाटेत त्याने अनेकांवर हल्ले केले. यात सहा जणांना किरकोळ दुखापत झाली, तर एक तरुणी गंभीर जखमी झाली. अखेर ८ तासांच्या थरारानंतर वनविभागाने त्याला बेशुद्ध केले आणि परिसरातील सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
सकाळपासून परिसरात नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. दरम्यान, हा बिबट्या नर जातीचा असून साधारण ४ ते ५ वर्षांचा असल्याची माहिती आहे.
तिसऱ्या प्रयत्नात बेशुद्ध
उपवनसंरक्षक सचिन रेपाळे, वन परिक्षेत्र अधिकारी वळवी, काळभोर आदी व कर्मचारी व रोहित मोहिते, संतोष शिंदे यांच्या पथकाने बंदुकीने भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आणखी आक्रमक झाला. अखेर तिसऱ्या प्रयत्नात इंजेक्शन लागले आणि तो बेशुद्ध झाला.
अशी उडाली त्रेधातिरपीट
सकाळी साडेसातच्या सुमारास इमारतीच्या आवारात आणि कुंपणावरून उडी मारताना पाहिले. त्याने दीपू भौमिक (५२) व छगनलाल बागरेचा (४८) यांच्यावर आणि पारस इमारतीत राहणाऱ्या रामप्रसाद सहानी व राकेश यादव यांच्यावर जिन्यात हल्ला केला. त्यानंतर, पहिल्या मजल्यावर भारती टांक यांच्या घरात घुसला.
त्याने भारती आणि त्यांची १९ वर्षांची मुलगी खुशबू यांना त्याने लक्ष्य केले. दोघीही घाबरून बाल्कनीच्या लोखंडी जाळीत लपल्या, तर बेडरूममध्ये झोपलेली त्यांची २३ वर्षीय मुलगी अंजली उठून बाहेर आली असता, बिबट्याने हल्ला चढवला. त्यात तिचे तोंड, हात व डोक्याला गंभीर दुखापत झाली. ती किंचाळल्याने बिबट्या बाजूला झाला. त्याबरोबर अंजली बेडरूमच्या खिडकीत लपली.
लग्न जवळ आले असताना प्लास्टिक सर्जरी
घरात लग्नाची लगबग असताना बिबट्याने हल्ला केल्याने अंजली मानसिक धक्क्यात आहे. चेहऱ्यावर जखमा झाल्याने प्लास्टिक सर्जरी करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. तिला सुरुवातीला भीमसेन जोशी रुग्णालयात आणि नंतर मुंबईच्या केईएम रुग्णालयात नेले. तत्पूर्वी अग्निशमन अधिकारी जगदीश पाटील यांच्यासह बुद्धा नांगरे, नंदकुमार घरत, मयूर पाटील, अमर पाटील यांनी शिडीच्या साहाय्याने जखमी अंजलीला बाहेर काढले.