Join us

विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या

By यदू जोशी | Updated: July 9, 2025 07:02 IST

शिंदे यांनी त्यात काही बदल करून आपल्या अधिकारात जबाबदाऱ्यांचे वाटप केले. त्यामुळे भोळे आणि अन्य तीन सचिवांमध्ये काही महिने सुरू असलेला छुपा संघर्ष संपण्याची चिन्हे आहेत.

यदु जोशीमुंबई : विधानमंडळ कार्यालयातील एकाच सचिवांकडे (जितेंद्र भोळे) केंद्रित असलेले अधिकार, त्यामुळे इतरांची तीव्र नाराजी, या पार्श्वभूमीवर विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी आता चारही सचिवांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत. त्यासंबंधीचा आदेश मंगळवारी काढण्यात आला. 

विधान मंडळातील ३ अधिकाऱ्यांना चार महिन्यांपूर्वीच पदोन्नती मिळाली होती. मात्र, त्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले नव्हते. सूत्रांनी सांगितले की, या तीन सचिवांनी याबाबत सभापती प्रा. राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्याकडे तक्रार केली होती. अखेर दहा दिवसांपूर्वी भोळे यांनी जबाबदारी वाटपाचा प्रस्ताव राम शिंदे यांच्याकडे पाठविला. मात्र, शिंदे यांनी त्यात काही बदल करून आपल्या अधिकारात जबाबदाऱ्यांचे वाटप केले. त्यामुळे भोळे आणि अन्य तीन सचिवांमध्ये काही महिने सुरू असलेला छुपा संघर्ष संपण्याची चिन्हे आहेत.

जितेंद्र भोळे : सचिव १विधानसभा सभागृहासंबंधीचे कामकाज,  प्रश्न, विधानसभा, लोकलेखा समिती, विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती, विशेष हक्क समिती (विधानसभा), आश्वासन समिती (विधानसभा) मराठी भाषा समिती कक्ष, विधानसभा सदस्यांबाबत संविधानाच्या दहाव्या अनुसूचीअंतर्गत उद्भवणारी  प्रकरणे, अध्यक्षांच्या निर्णयांचे संकलन, विधानसभा विभागीय निर्णय, सुरक्षा विभाग, न्यायालयीन प्रकरणे. भोळे हे विधानसभा सचिव असतील, अधिवेशन काळात तळेकर या सचिव असतील.

मेघना तळेकर : सचिव २विधानसभा सभागृहासंबंधी कामकाज, सचिव राष्ट्रकुल संसदीय मंडळ, आस्थापनाविषयक कामकाज, लेखा कक्ष, रोजगार हमी योजना समिती कक्ष, विनंती अर्ज समिती, नियम समिती (विधानसभा),  उपविधान समिती, इतर मागासवर्ग कल्याण समिती, महिला व बालकांचे हक्क कल्याण समिती, सूचना कक्ष, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र. आस्थापनाविषयक सर्व अधिकार हे सचिव २ मेघना तळेकर यांना दिल्याने त्यांच्याकडेच प्रशासनाची सूत्रे असतील. 

डॉ. विलास आठवले : सचिव ३विधान परिषद सभागृहासंबंधी कामकाज, प्रश्न, विधान परिषद, अंदाज समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती, आश्वासन समिती विधान परिषद, अल्पसंख्याक कल्याण समिती, धर्मदाय खासगी रुग्णालयांची तपासणी करणे यासंबंधीची समिती, आजी-माजी आमदारांचे वेतन, निवृत्तीवेतन आणि इतर सुविधा, अग्निशमन कक्ष, सभापतींच्या निर्णयांचे संकलन, विधान परिषद विभागीय निर्णय, विधान परिषद सदस्यांसंदर्भात उद्भवणारी प्रकरणे.

शिवदर्शन साठे : सचिव ४विधान परिषद सभागृहासंबंधी कामकाज, संगणक, अर्थसंकल्प कक्ष, सार्वजनिक उपक्रम, पंचायतराज समिती, अनुसूचित जमाती कल्याण, विशेष हक्क समिती - विधान परिषद, विनंती अर्ज समिती - नियम समिती : विधान परिषद, वातावरणीय बदल समिती, सामान्य कक्ष, सामग्री कक्ष, अनुवाद तथा संपादन कक्ष, प्रतिवेदन फीतध्वनी मुद्रण व टंकलेखन कक्ष, जनसंपर्क कक्ष, ग्रंथालय संशोधन व संदर्भ कक्ष, राजशिष्टाचार विषयक कामे, निवडणूक कामकाज तसेच नागपूर कक्ष.

सभापतींच्या आदेशानुसार... विधानमंडळ सचिवालयाच्या कामकाजावर धोरणात्मक निर्णयासाठी विशेष मंडळाची (मुख्यमंत्री, सभापती, अध्यक्ष) मान्यता आवश्यक आहे. इतर सचिवांनी फायली भोळेंकडे न पाठवता थेट विशेष मंडळाकडे पाठवाव्या.

टॅग्स :विधानसभाराम शिंदे