मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:23 IST2026-04-11T12:16:02+5:302026-04-11T12:23:04+5:30
मंत्री नरहरी झिरवाळ प्रकरणातील व्यक्तीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.

मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
Bombay High Court: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी संबंधित कथित आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणाने आता कायदेशीर वळण घेतले आहे. या प्रकरणात ज्या व्यक्तीवर व्हिडिओ लीक केल्याचा आरोप आहे, त्याने आता थेट मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला असून, आपल्यावरील एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. या नव्या घडामोडीमुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये मंत्री नरहरी झिरवाळ एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबईतील कफ परेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही तक्रार त्याच ट्रान्सजेंडर व्यक्तीने दाखल केली होती, जिने आरोपीला आपला भाऊ असल्याचे सांगितले आहे.
आरोपीने मूळ व्हिडिओशी छेडछाड करून तो लीक केल्याची तक्रार करण्यात आली होती. व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीचा हायकोर्टात प्रतिहल्ला
आरोपीने हायकोर्टात याचिका दाखल करून स्वतःवरील आरोप फेटाळले आहेत. त्याने दावा केला की, त्याला जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. संबंधित ट्रान्सजेंडर व्यक्तीवरच खंडणी, ब्लॅकमेलिंग, गुन्हेगारी धमकी आणि कटाचे आरोप लावून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्याने केली आहे. तसेच कफ परेड पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर कायदेशीररित्या चुकीची असल्याचे सांगत ती रद्द करण्याची विनंती त्याने न्यायालयाला केली आहे.