Join us  

Uday Samant: ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात दाखल झाले, शिवसेना सोडली का? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 1:43 PM

Uday Samant: बंडाळीच्या सुरुवातीला ठाकरेंच्या सोबत असलेले उदय सामंत धक्कादायकरीत्या विरोधकांना जाऊन मिळाले आहेत.  त्यामुळे उदय सामंत यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. तसेच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, उदय सामंत यांनी या सर्व घटनाक्रमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई - चाळीसहून अधिक आमदारांनी एकनाथ शिंंदेंच्या नेतृत्वात बंड पुकारल्याने शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. सध्या गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये ठाण मांडून असलेल्या या बंडखोर आमदारांना शिवसेनेतील एकेक आमदार जाऊन मिळत आहे. त्यामुळे बंडखोरांचा आकडा चांगलाच वाढत चालला आहे. दरम्यान,  या बंडाळीच्या सुरुवातीला ठाकरेंच्या सोबत असलेले उदय सामंत धक्कादायकरीत्या विरोधकांना जाऊन मिळाले आहेत.  त्यामुळे उदय सामंत यांच्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. तसेच शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान, उदय सामंत यांनी या सर्व घटनाक्रमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

उदय सामंत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान सहयोगी पक्षाकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले.  त्यामुळेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून,  त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असे उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

मी एकनाथ शिंदे वगळता कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही, त्यामुळे शिवसैनिकांनी गैरसमजाला बळी पडू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत, असेही उदय सामंत यांनी सांगितले आहे. 

  गेल्या आठवड्यात विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर  दुसऱ्या दिवशी सकाळी एकनाथ शिंदे काही आमदारांसह गुजरातमधील सूरत येथे गेले होते. त्यानंतर त्यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढत गेली. सध्या शिवसेनेमधील ४० च्या आसपास आणि अपक्ष आणि इतर मिळून ५० जणांचा पाठिंबा शिंदे गटाकडे आहे. 

टॅग्स :उदय सामंतशिवसेनाएकनाथ शिंदे