भाषा, लिपी शिकू चित्रांच्या माध्यमातून; जहांगीर आर्ट गॅलरीत आजपासून कलाप्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 06:01 IST2025-01-28T06:01:39+5:302025-01-28T06:01:53+5:30
क्षरभारती ही कलाकृती सुलेखन कलाप्रदर्शन आणि पुस्तक या दोन्ही स्वरुपांत आज, २८ जानेवारी रोजी सादर होणार आहे.

भाषा, लिपी शिकू चित्रांच्या माध्यमातून; जहांगीर आर्ट गॅलरीत आजपासून कलाप्रदर्शन
रूपाली ठोंबरे, अक्षर लेखन अभ्यासक
मुंबई : भारतात दर दहा मैलांवर भाषा बदलते असे म्हटले जाते. प्रत्येक भाषेचा स्वत:चा असा एक लहेजा असतो. त्या त्या भाषकांना आपल्या भाषेचा अभिमान असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक भाषेत एक वळणदार लिपीही असते. जे भाषेचे तेच लिपीचे. भाषेनुसार लिपीची अक्षरे बदलतात. भाषा आणि लिपींमधील हेच सौंदर्य सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुलेखन या माध्यमाची जोड दिली आहे जागतिक कीर्तीचे सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी. त्यातूनच अक्षरभारती ही कलाकृती सुलेखन कलाप्रदर्शन आणि पुस्तक या दोन्ही स्वरुपांत आज, २८ जानेवारी रोजी सादर होणार आहे.
अक्षरांची सुरेख रचना
एकूण सात सुलेखनकार या प्रदर्शनात सहभागी होऊन ‘जहांगीर आर्ट गॅलरी’ कलादालनात भारतातील विविध भाषा आणि लिपी चित्ररूपात सादर करतील. रंग, कला, कल्पना आणि अक्षरांची आकर्षक सुरेख रचना हा या प्रदर्शनाचा मूळ पाया आहे.
जहांगीर आर्ट गॅलरीत आजपासून कलाप्रदर्शन
संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम, उडिया, मराठी, आसामी, बंगाली, पाली, प्राकृत या ११ अभिजात भाषा; जैनी, सिद्धम, मोडी, ग्रंथ, शारदा, ब्राह्मी यांसारख्या प्राचीन लिपी आणि सध्या नेहमीच्या वापरात असलेल्या देवनागरी, गुजराथी, पंजाबी अशा अनेक भाषा आणि लिपी या प्रदर्शनात पाहावयास मिळतील.
या प्रत्येक लिपीचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे. रेषा आणि बिंदूंची विविध समीकरणे असलेल्या अक्षरांचे मूळ स्वरूप लक्षात घेऊन ती पारंपरिक किंवा अभिनव पद्धतीने मांडून ती अधिक सुंदररीत्या समोर येतील तेव्हा नक्कीच हे कलाप्रेमींसाठी एक आगळेवेगळे आकर्षण असेल.
लेखनशैली, घडण आणि लेखनसाहित्य वेगळ्या पद्धतीने वापरले तर अक्षरांचे रूप किती पालटू शकते आणि तेही त्याचे स्वत्व जपून हा एक सुंदर अनुभव इथे मिळेल. या कलाप्रदर्शनासोबतच ‘अक्षरभारती’ या नावाने एक भारतीय भाषा आणि लिपींनी समृद्ध असे एका पुस्तकाचेही अनावरण होणार आहे.
हे पुस्तक देशातील ३५ सुलेखनकार, अनेक भाषा व लिपी, विविध सुलेखन व चित्रशैली यांचा अनोखा संगम आहे. भारतात प्रथमच इतक्या सुलेखनकारांनी एकत्र येऊन लिपी आणि भाषांवर काम केले आहे जो भारतीय सुलेखनासाठी एक नवा विक्रम आहे. अनेक दिग्गजांच्या अनुभवातील लेखांनी समृद्ध अशा या पुस्तकात भाषा, लिपी आणि सुलेखन क्षेत्रातील अनेक लेख समाविष्ट आहे.