मुंबई - वांद्रे पश्चिम येथील स्वामी विवेकानंद मार्गावर लकी जंक्शन येथे पाली हिल जलाशयाला पाणी पुरवठा करणाऱ्या २ जलवाहिन्या पैकी एका ६०० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला रात्री २ वाजेच्या सुमारास अचानक गळती सुरु झाली आहे.
पाणी गळती रोखण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. जलवाहिनीच्या गळतीमुळे एच पश्चिम विभागाचा पाणीपुरवठा प्रभावित झाला आहे. काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असून दुरुस्ती काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जाणार आहे. काही भागात वेरावली जलाशय व उर्वरित दुसऱ्या पाली इनलेटद्वारे कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.