Join us  

महाराष्ट्राची पताका जगात फडकवणाऱ्या डिसले गुरुजींच्या घरून दरेकर फडणवीसांना फोन करतात तेव्हा...

By मुकेश चव्हाण | Published: December 05, 2020 3:03 PM

राज्याच्या विधीमंडळामध्ये रणजीतसिंह डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली.

मुंबई/ सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झालेल्या ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सोलापूरमध्ये जाऊन रणजीतसिंह डिसले यांचा आज सन्मान केला. इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीची कामगिरी डिसले सरांची आहे. रणजित डिसले यांची विधानपरिषदेच्या 12 जागांपैकी एक जागेसाठी शिफारस करु, असही प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले. 

राज्याच्या विधीमंडळामध्ये रणजीतसिंह डिसले सरांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार असल्याची माहिती देखील प्रवीण दरेकर यांनी दिली. आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे की, शिक्षक मतदारसंघात शिक्षक नसलेला आमदार होतो, ज्यांच्यासाठी तो मतदारसंघ असतो तो नसतो. साहित्यिक, प्राध्यापक यासाठी मतदारसंघ असतात, मात्र दुर्दैवाने निवडणूक होतात, त्यामुळे भाजपाच्यावतीने रणजीतसिंह डिसले यांच्या आमदारपदासाठी शिफारस करणार असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले. 

रणजीतसिंह डिसले यांची प्रवीण दरेकर यांनी भेट घेतल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरुन बोलणे करुन दिले. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील रणजीतसिंह डिसले यांना त्यांच्या कार्याचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 'ग्लोबल टीचर प्राईज' पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. 7 कोटी रुपयांचा हा पुरस्कार डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे रणजितसिंह पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. 

जगभरातील 140 देशांतील 12 हजारहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी 50 टक्के रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल.

दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले- रणजित डिसले

दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले. हा क्षण म्हणजे आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तसेच शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केल्याची भावना ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी व्यक्त 'लोकमत' शी बोलताना केली.

एकाच दिवशी दोन गुड न्युज...

रणजित डिसले यांचे वडील महादेव डिसले हे देखील सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक आहेत. या पिता पुत्राने एकाच केंद्रात नोकरी केली आहे. महादेव डिसले यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत. मोठा मुलगा अमित हा इंजिनिअर असून तो महिंद्रा कंपनीत प्रोजेक्ट इंजिनिअर आहे. योगायोग म्हणजे आजच त्याचे ही प्रमोशन झाले आणि दुसऱ्या मुलाला जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळाला हे अभिमानास्पद असल्याचे महादेव डिसले यांनी सांगितले.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसप्रवीण दरेकरभाजपामहाराष्ट्र सरकार