Join us
Daily Top 2Weekly Top 5

'जनतेने ही विचार करण्याची बाब आहे'; नितीन गडकरींच्या विधानावर अजित पवार स्पष्टच बोलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 20:04 IST

नितीन गडकरींच्या या विधानावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- मनात राजकारण सोडण्याचे विचार येत असल्याची कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती. परंतु, जेव्हा विचार करतो तेव्हा राजकारण नेमके कशासाठी करायला हवे, हे लक्षात येते असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. 

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांनी ७५ व्या वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्त शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांचा अमृत महोत्सवी सत्कार करताना नितीन गडकरी बोलत होते. मी गिरीष गांधींना म्हणायचो राजकारण करू नका, मला खूप वेळा वाटते केव्हा सोडायचे केव्हा नाही. राजकारणापेक्षा बऱ्याच गोष्टी जीवनात करण्यासारख्या आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले.  

नितीन गडकरींच्या या विधानावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मंत्री म्हणून ते फार लोकप्रिय आहेत. त्यांचा अनुभव फार मोठा आहे. मात्र सत्ताधारी पक्षात असतानाही त्यांच्या मनात अशी भावना येते, ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने विचार करण्याची बाब आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. 

दरम्यान, मी आजपर्यंत बॅनर लावला नाही. उंदरासारखे आमचे फोटो लावतात आणि खाली स्वत:चा मोठा फोटो लावतो असा टोला गडकरींनी राजकारणात बॅनरबाजी करणाऱ्या नेत्यांना लगावला. आता खऱ्या अर्थाने 'राजकारण' या शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण आहे की सत्ताकारण? आहे. जुन्या काळात महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने जे कार्य झाले, ते राजकारण होतं पण ते राष्ट्रकारण, समाजकारण आणि विकासकारण होतं. परंतु सध्या १०० टक्के सत्ताकारण आहे, असे गडकरी म्हणाले.

सोशल मीडियावर वेगळीच चर्चा-

नितीन गडकरींच्या विधानाची सोशल मीडियावर सध्या वेगळीच चर्चा रंगली आहे. अनेक नेटकऱ्यांनी नितीन गडकरींच्या या विधानाचं स्वागत केलं आहे. मात्र काही नेटकऱ्यांनी नितीन गडकरींना पंतप्रधान आणि राष्ट्रपती बनण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

टॅग्स :अजित पवारनितीन गडकरी