मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण, माजी मंत्री बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात सहभाग असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला कॅलिफोर्नियामधून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरण आणि बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात अनमोल बिष्णोईचे नाव समोर आले. वांद्रे परिसरातील अभिनेता सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर १४ एप्रिल रोजी करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणात लॉरेन्स आणि अनमोल बिष्णोईविरोधात गुन्हा नोंदवला होता.
अनमोलने सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारीही स्वीकारली होती. त्याच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी करण्यात आली होती. अनमोलविरोधात १८ गंभीर गुन्हे नोंद आहेत.
लॉरेन्स कारागृहात असताना अनमोल त्याचे आर्थिक व्यवहार सांभाळून, टोळी चालवत आहे. सर्व यंत्रणा मागावर असल्याने अनमोल बनावट पासपोर्ट आधारे भारतातून पळून गेला होता. तो कॅनडा व अमेरिकेत ठिकाण बदलून राहत होता. याशिवाय केनियामध्येही तो गेला होता, अशी माहिती समोर येत आहे.