मंत्री रावल यांच्या कंपनीचा रिसॉर्टवर बेकायदा ताबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 04:40 IST2018-02-08T04:40:12+5:302018-02-08T04:40:36+5:30
पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या कंपनीने नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील एमटीडीसीचा रिसॉर्ट बेकायदा ताब्यात ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मंत्री रावल यांच्या कंपनीचा रिसॉर्टवर बेकायदा ताबा
मुंबई : पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या कंपनीने नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ येथील एमटीडीसीचा रिसॉर्ट बेकायदा ताब्यात ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शिवाय, रावल यांच्या दोन कंपन्या काळ्या यादीत असून तसे पुरावे आमच्याकडे आहेत, असा दावाही मलिक यांनी केला.
तोरणमाळ हिल रिसॉर्ट ही कंपनी मंत्री रावल यांच्या मालकीची असून मंत्रिपदी वर्णी लागतच त्यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांचे वडील संचालक आहेत. या कंपनीने तोरणमाळ हिलवरील एमटीडीसीचे रिसॉर्ट १९९१ मध्ये चालवायला घेतले. मात्र, नंतर दहा वर्षासाठी भाडेकरार वाढवून घेण्यात आला, पण ६० लाख रुपयांचे भाडे थकविण्यात आले आहे. एमटीडीसीचे कर्मचारी भाडेवसुलीसाठी गेले असता त्यांच्यावर गावगुंडांकरवी हल्ला करण्यात आला, असा आरोप मलिक यांनी केला.
>कंपनी सुरूच आहे
सरकारने जाहीर केलेल्या काळ्या यादीतील कंपन्यांमध्ये रावल यांच्या तोरणमाळ हिल रिसॉर्ट प्रा. आणि डेव्हलपर्स या दोन कंपन्यांचा समावेश आहे. शिवाय, रावल यांच्याकडे ४ डीन नंबर आहेत. तोरणमाळ रिसॉर्ट कंपनी बंद असल्याचा दावा करण्यात येत असला तरी ७ हजार रुपये भरुन आॅनलाईन बुकिंग केले असता हे रिसॉर्ट सुरु असल्याचे समोर आल्याचे मलिक यांचे म्हणणे आहे.
रावल यांचा राजीनामा घ्या
राज्याच्या पर्यटन मंत्र्यांनीच एमटीडीसीचा रिसॉर्ट बेकायदा ताब्यात ठेवणे ही गंभीर बाब असून मुख्यमंत्र्यांनी रावल यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही मलिक यांनी ेकेली.