मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्यावतीने नागपाडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या विशेष मुलांसाठीच्या प्रारंभिक उपचार आणि पुनर्वसन केंद्राचे आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेने सुरु केलेले हे केंद्र खाजगी रुग्णालयापेक्षाही उत्तम आहे. मुंबई महानगरपालिका किती चांगले काम करू शकते हे या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
विशेष मुलांच्या पालकांना कायमच आपल्या मुलांची काळजी वाटत असते. त्यांच्या गरजा ही विशेष असतात, या रुग्णालयाच्या माध्यमातून त्या पूर्ण होत आहेत. अशा प्रकारची अजून दोन केंद्र पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये सुरू करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. या केंद्रामध्ये या मुलांवर मोफत उपचार केले जाणार आहेत ही समाधानाची बाब असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच या केंद्रामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
मुंबईत आज सर्वत्र संपूर्ण स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता कर्मचारी हे या मोहिमेचे खरे हिरो आहेत. या मोहिमेअंतर्गत मुंबई स्वच्छ करून ती अधिक सुंदर करण्याचा मानस आहे. स्वच्छ सुंदर निरोगी प्रदूषण मुक्त मुंबईसाठी सरकार प्रयत्न करीत असून या मोहिमेचे दृश्य परिणाम येत्या काही दिवसात नक्की दिसून येतील असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.
राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेत आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. रुग्णालयांमध्ये आगामी काळात झिरो प्रिस्क्रीप्शन च्या माध्यमातून मोफत औषधे उपलब्ध करून दिली जातील असेही यावेळी एकनाथ शिंदेंनी सांगितले.