‘आयएनएस करंज’चे जलावतरण; भारताचे सागरी सामर्थ्य वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 02:33 IST2021-03-11T02:32:31+5:302021-03-11T02:33:05+5:30
कलावरी, खंदेरीनंतरची तिसरी पाणबुडी

‘आयएनएस करंज’चे जलावतरण; भारताचे सागरी सामर्थ्य वाढले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतीय नाैदलाचे सामर्थ्य वाढवणारी पाणबुडी बुधवारी नौदलाच्या सेवेत दाखल झाली. ‘आयएनएस करंज’ असे या पाणबुडीचे नाव असून, यानिमित्ताने भारताची सागरातील सामर्थ्य वाढले आहे.
माजी नौदलप्रमुख अॅडमिरल व्ही. एस. शेखावत हे यासंदर्भात आयाेजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग तसेच भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारीही या वेळी उपस्थित होते. यापूर्वीची करंज ही रशियन बनावटीची ‘फॉक्सट्रॉट’ प्रकारची पाणबुडी २००३ साली सेवेतून निवृत्त करण्यात आली होती. या पाणबुडीवर तैनात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले होते.
फ्रान्सची नेव्हल ग्रुप ही कंपनी आणि माझगाव डॉक यांच्या संयुक्त सहभागाने २००७ पासून ‘स्कॉर्पिन’ श्रेणीतील सहा पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे. त्यापैकी पहिल्या दोन पाणबुड्या ‘आयएनएस कलावरी’ आणि ‘आयएनएस खंदेरी’ या अनुक्रमे २०१७ आणि २०१९ मध्ये नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्या. ‘आयएनएस करंज’ ही तिसरी पाणबुडी पश्चिमी नौदलाच्या ताफ्याचा भाग असेल.
वैशिष्ट्ये...
nजगातील सर्वांत लहान पाणबुड्यांपैकी एक.
nआवाज न करता आणि शत्रूच्या रडारवर न दिसता थेट हल्ला करू शकते.
nदुष्मनांच्या नकळत समुद्रात माईन्स पेरून त्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याची क्षमता.
n७० मीटर लांबी, १२ मीटर उंची आणि १६०० टन वजन. आकाराने लहान असल्याने पाण्यात लांबून शत्रूच्या नजरेत येणे अवघड.
इतिहासावर नजर
पूर्वीच्या रशियन महासंघातील ‘रिगा’ येथे ४ सप्टेंबर १९६९ रोजी नौदलाच्या सेवेत रुजू झालेल्या जुन्या ‘आयएनएस करंज’ पाणबुडीने तत्कालीन कमांडर व्ही. एस.
शेखावत यांच्या नेतृत्वाखाली १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला होता.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, भारत-पाक युद्धात सहभागी झालेल्या या पाणबुडीचे कमांडिंग अधिकारी एम.एन.आर. सामंत यांनी १९७१ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या बांगलादेश नौदलाचे प्रमुख पद भूषविले होते.