ताजा विषय: हवामान खात्यावर भरोसा नाय का? होरपळ होते ते बळिराजाची

By सचिन लुंगसे | Published: June 12, 2022 05:21 AM2022-06-12T05:21:54+5:302022-06-12T05:22:33+5:30

कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतामधील शेतकऱ्यांना मान्सूनने वेळोवेळी गुंगारा दिला आहे.

Latest Topic Why not trust the weather department | ताजा विषय: हवामान खात्यावर भरोसा नाय का? होरपळ होते ते बळिराजाची

ताजा विषय: हवामान खात्यावर भरोसा नाय का? होरपळ होते ते बळिराजाची

googlenewsNext

सचिन लुंगसे

कृषिप्रधान देश म्हणून ओळख असलेल्या भारतामधील शेतकऱ्यांना मान्सूनने वेळोवेळी गुंगारा दिला आहे. विशेषत: गेल्या दहा दिवसांपासून गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगाळला असतानाच भारतीय हवामान शास्त्र विभागालादेखील मान्सूनचा अंदाज लागेनासा झाला होता आणि नेमके याचवेळी शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन करत राज्य सरकारने हवामान खात्याच्या जखमेवर मीठ चोळले. मुळात हवामान खाते, अंदाज यांचा ताळमेळ तसा जुळतच नाही; कारण तो अंदाज असतो. मात्र, यात होरपळ होते ते बळिराजाची. परंतु, गेल्या काही वर्षांपासून हवामान खात्याने अत्याधुनिक तंत्राचा वापर करत हवामान अंदाज वर्तविण्यात आघाडी घेतली असली तरी आजही पावसाची वाट पाहत बळिराजा आकाशाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र असते.

गेल्या काही वर्षांपासून विशेषत: सोशल मीडियाचे आगमन झाल्यापासून अंदाज अधिकच वेगाने दिले जात आहेत. मात्र, त्यात अचूकता साधता आलेली नाही. उलटपक्षी जुने पुराने व्हिडिओ अपलोड करत दिशाभूल करणारी माहिती देत मान्सूनसह उर्वरित अंदाजांचा नेटीझन्सकडून पाऊस पाडला जातो. मात्र, त्यालाही चाप लावण्याचे काम हवामान खात्याने केले आहे. विशेषत: गेल्या चार एक वर्षांत हवामान खात्याने अशा माहितीवर विश्वास ठेवू नका, हवामान विभागाचे अंदाज फॉलो करा, असे आवाहन करत विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. तसे पाहिले तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबादसह लगतचे जिल्हे दुष्काळी म्हणून गणले जातात. येथील शेतकऱ्यांसाठी पावसाचे अंदाज म्हणजे जणूकाही आनंद वार्ताच. त्याला जोड देण्यासाठी हवामान खात्याने आपल्या कामात गेल्या काही वर्षांत खूप सुधारणा केली असली तरी शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हवामानाचा अंदाज पोहोचत नाही ही देखील खरी वस्तुस्थिती आहे.

हवामान खात्याने आधुनिक तंत्राची जोड दिली. जिल्हा, तालुका स्तरावर यंत्रे बसविली. हवामानाचा अंदाज वर्तविणारे ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले. नाही म्हटले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोच. मात्र, प्रत्येकवेळी त्यावर त्यांना अवलंबून राहता येत नाही. सोलापूरसारख्या दुष्काळी भागात पावसाळ्याच्या चार महिन्यांत तीन मोठे पाऊस झाले की आम्ही सुखावतो; याचे दाखले येथील शेतकरी तोंडी देतात. हे केवळ एका ग्रामीण भागापुरते मर्यादित राहत नाही.

पूर्वसूचनांकडे लक्ष द्यावेच लागेल
- विदर्भ, खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. सह्याद्रीमुळे कोकणात चांगला पाऊस होतो. मात्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे.

- इकडे ना अरबी समुद्रातून ढग येतात, ना बंगालच्या उपसागरातून; म्हणून हे प्रदेश दुष्काळी. बरे हे कोणी दुसरे तिसरे सांगत नाही, तर हवामान खातेच याला दुजोरा देते. मेगासिटीचा विचार करता मुंबईसारख्या म्हणजे किनारी भागात ढगफुटी होत नाही. मात्र, तरीही तसा पाऊस होण्यापूर्वी हवामान खाते आवर्जून आता तीन तासांचे अलर्ट देते.

- महापालिका, विमानतळसारख्या प्राधिकरणांना पूर्वसूचना देते. तर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असेल तर तसाही अलर्ट दिला जातो. थोडक्यात म्हणजे हवामान खात्याच्या पूर्वसूचनांकडे लक्ष द्यावेच लागेल; त्यांना नाकारून, त्यांच्या अंदाजांकडे दुर्लक्ष करून कोणालाच पुढे जाता येणार नाही. 

Web Title: Latest Topic Why not trust the weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.