अत्याधुनिक ‘खांदेरी’ २८ सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात सामील होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 01:06 AM2019-09-14T01:06:59+5:302019-09-14T06:41:00+5:30

स्कॉर्पीन श्रेणीतील दुसरी पाणबुडी; नौदलाची क्षमता वाढणार

The latest 'Khanderi' will join the Navy on September 9 | अत्याधुनिक ‘खांदेरी’ २८ सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात सामील होणार

अत्याधुनिक ‘खांदेरी’ २८ सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात सामील होणार

Next

मुंबई : भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्कॉर्पीन श्रेणीतील ‘खांदेरी’ ही अत्याधुनिक पाणबुडी सप्टेंबर महिनाअखेर दाखल होणार आहे. यामुळे नौदलाच्या ताफ्यात व एकूण क्षमतेत वाढ होईल. या पाणबुडीचे वैशिष्ट्य म्हणजे ती दुसऱ्या जहाजांच्या रडारवर दिसत नाही; त्यामुळे युद्धकाळात त्याचा मोठा लाभ होईल.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत २८ सप्टेंबरला नेव्हल डॉकयार्ड येथे ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात येईल, अशी माहिती नौदलाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कमांडर मेहुल कर्णिक यांनी दिली. या वेळी नौदल प्रमुख उपस्थित राहतील. स्कॉर्पीन श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी आहे. यापूर्वी कलवरी ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली आहे. माझगाव डॉक लिमिटेड व फ्रेंच कंपनीच्या सहकार्याने स्कॉर्पीन पाणबुडी निमिर्तीचे काम सुरू आहे. पहिली पाणबुडी २०१२ मध्ये तयार होणे अपेक्षित होते. मात्र त्याला विलंब झाला होता.

पहिली पाणबुडी २०१७ च्या डिसेंबर महिन्यात नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. खांदेरीच्या समावेशानंतर आयएनएस करंजही लवकरच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. २०२२-२३ पर्यंत उर्वरित ४ पाणबुड्या नौदलाच्या ताफ्यात येतील. सध्या भारतीय नौदलाच्या ताफ्यात १३ कन्व्हेन्शनल पाणबुड्या कार्यरत आहेत. एकूण १८ पाणबुड्यांची देशाला आवश्यकता आहे. १३ पैकी एकतृतीयांश पाणबुड्यांची दुरुस्ती व देखभाल सुरू आहे.

२५ हजार ७०० कोटी रुपयांचा खर्च करून पी-७५ प्रकल्पांतर्गत ६ पाणबुड्या बनविण्याचे कंत्राट माझगाव डॉकला देण्यात आले आहे. आधी कलवरी व आता खांदेरी दाखल झाल्यानंतर इतर ४ पाणबुड्या २०२२ पर्यंत नौदलाच्या सेवेत दाखल होण्याची अपेक्षा आहे.

शत्रूवर थेट हल्ला करण्याची क्षमता

  • अत्याधुनिक सुविधांनी युक्त कन्व्हेन्शनल डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी.
  • पाण्यात आवाजाच्या तरंगावरून पाणबुडीचा शोध घेतला जातो; मात्र
  • या पाणबुडीचा आवाज येत नसल्याने रडारवर ही पाणबुडी दिसत नाही.
  • या पाणबुडीत शत्रूवर थेट हल्ला करण्याची तसेच कोणत्याही स्थितीत कार्यरत राहण्याची क्षमता आहे.
  • तिचा वेग प्रति तास २० नॉटिकल मैल आहे.
  • ती सलग ४५ दिवस पाण्यात राहू शकते.
  • यावर ३७ नौसैनिक तैनात असून पाण्यात ३०० मीटर खोल जाण्याची तिची क्षमता आहे.
  • ६७ मीटर लांब, ६.२ मीटर रुंद व १२.३ मीटर उंच या पाणबुडीचे वजन १,५५० टन आहे.

Web Title: The latest 'Khanderi' will join the Navy on September 9

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.