Lata Mangeshkar's slight improvement in nature; C | Lata Mangeshkar's Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा; उपचारांना चांगला प्रतिसाद
Lata Mangeshkar's Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत किंचित सुधारणा; उपचारांना चांगला प्रतिसाद

मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांना संसर्ग होऊ नये, म्हणून कुणालाही भेटू दिले जात नसल्याची माहिती त्यांच्या भगिनी आणि ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी ‘लोकमत’ला मंगळवारी दिली.

लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी लतादीदींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी त्यांनी मंगेशकर कुटुंबीयांशीही संवाद साधला. डॉ. अश्विन मेहता लता मंगेशकर यांच्यावर उपचार करीत आहेत.

लतादीदींना गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत कफ साचल्यानेही त्यांना त्रास होत होता. कफ बाहेर काढण्यात आल्याचे डॉ. अश्विन मेहता यांनी विजय दर्डा यांना सांगितले, तसेच नलिकेद्वारे त्यांना जीवनावश्यक घटकांचा पुरवठा करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. लतादीदींच्या प्रकृतीवर डॉ. प्रतीक समधानी देखरेख ठेवून असून, उपचाराला त्या उत्तम प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

लतादीदींच्या हृदयातील डाव्या झडपेतील बिघाड, गंभीर स्वरूपाचा न्यूमोनिया आणि ९१ वर्षे हे वय यामुळे सुरुवातीला त्यांची अवस्था चिंताजनक होती, परंतु हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असून, त्यांना द्रवरूपी जेवण आणि औषधे कृत्रिम नलिकेच्या माध्यमातून
देण्यात येत आहेत, असे डॉक्टरांनी सांगितले.

सध्या लतादीदींच्या प्रकृतीला कोणताही धोका नसला, तरी त्यांच्या तब्येतीच्या सुधारणेकडे वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे, अशी माहितीही ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.

English summary :
Bharat Ratna singer Lata Mangeshkar's health is improving and she is not allowed to visit anyone so that she does not get infected, Senior singer Usha Mangeshkar told 'Lokmat' on Tuesday (19-November 2019).


Web Title: Lata Mangeshkar's slight improvement in nature; C

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.