मुंबई : राज्यात गेल्या तीन वर्षात तब्बल १ लाख ४ हजार ७१० अपघातांमध्ये ४५ हजार ९६१ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. दारूप्रमाणेच ड्रग्ज सेवन केलेल्या चालकांचीही टेस्ट यापुढे घेतली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
आ. काशीनाथ दाते यांनी या वाढत्या अपघातांसंदर्भातील प्रश्न विचारला होता. त्यावर सुधीर मुनगंटीवार, अभिमन्यू पवार, अतुल भातखळकर, आदित्य ठाकरे, गोपीचंद पडळकर, आदी सदस्यांनी उपप्रश्न विचारले.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, बहुतेक अपघात हे दारू पिल्याने होतात. चालक दारू प्यायला आहे की नाही याची टेस्ट घेतली जाते; पण आता मोठ्या शहरांमध्ये जे अपघात होतात, त्यांतील विशेषतः तरुण चालक हे ड्रग्ज पिऊन गाडी चालवीत असल्याचे निदर्शनास आले आहे; पण सध्या जी टेस्ट घेतली जाते, त्यामध्ये ड्रग्ज घेतलेले अडकत नाहीत. आता तीदेखील टेस्ट यापुढील काळात घेतली जाईल.
रस्ते अपघात टाळण्यासाठी ८०० कोटी रुपये जमा होते, त्यांतील बहुतेक पैसे परिवहन अधिकाऱ्यांसाठी वाहने खरेदी करण्यावर खर्च झाला, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. तेव्हा अपघाताच्या उपाययोजनांवरच हा निधी खर्च केला जाईल असे सरनाईक म्हणाले.

दंडाची रक्कम वाढवा
ठाकरे सेनेचे आ. आदित्य ठाकरे यांनी वाहन चालविताना नियम मोडणाऱ्यांवर जी दंडात्मक कारवाई केली जाते, त्या दंडाची रक्कम आणखी वाढवावी, अशी मागणी केली. यामुळे जरब बसून वाहतूक नियमांचे पालन केले जाईल.