Large squads that prevent water wastage are only on paper | पाण्याचा अपव्यय टाळणारे भरारी पथक कागदावरच

पाण्याचा अपव्यय टाळणारे भरारी पथक कागदावरच

मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. परंतु पिण्याचे पाणी बागकाम, गाडी धुणे अशा प्रकारच्या कामांवर वाया जाते. हे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेने २०१४ मध्ये विशेष भरारी पथकाची स्थापना केली. मात्र पाच वर्षांनंतरही या कक्षात कर्मचारीवर्ग नियुक्त करण्याचा मुहूर्त प्रशासनाला मिळालेला नाही. त्यामुळे पाण्याचा अपव्यय मुंबईत राजरोस सुरू आहे.
पिण्याव्यतिरिक्त पाण्याचा वापर बागकाम, शौचालय, घरकाम, वाहन धुणे, खाजगी यानगृह, वाहन दुरुस्ती केंद्र अशा ठिकाणी सुरू असतो. या कामामुळे साचलेल्या पाण्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी अशा नागरिकांवर कारवाई करण्याकरिता भरारी पथकाची स्थापना करावी, अशी ठरावाची सूचना पालिका महासभेत मंजूर झाली होती.
याबाबत प्रशासनाने दिलेल्या अभिप्रायानुसार अशा पथकाची स्थापना सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये करण्यात येणार आहे. जल अभियंता यांच्या अखत्यारीतील उप जल अभियंता यांच्या आस्थापनेवर १० पदे निर्माण करण्यास पदनिर्माण समितीच्या २०१४ मध्ये झालेल्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे. ही पदे भरण्यासाठी संबंधित विभागाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले आहे.
दरम्यान, मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. यापैकी सुमारे २० टक्के पाणी गळती व चोरीमध्ये वाया जाते. मुंबईची दररोजची पाण्याची मागणी ४२०० दशलक्ष लीटर एवढी आहे. नवीन जलस्रोत व पर्यायी व्यवस्था विकसित न केल्यास भविष्यात पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे. बागकाम, शौचालय, घरकाम, वाहन धुणे, अशा कामांवर दररोज सरासरी ६० टक्के चांगले पाणी वापरले जात असल्याचे उघडकीस आले आहे. पालिकेच्या विशेष भरारी पथकातील प्रशिक्षित कर्मचारी व अधिकारी वर्ग अनधिकृत जोडण्यासंबंधीच्या तक्रारी आदींचे निवारण करून योग्य कार्यवाही व महसुलात भर टाकतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Web Title:  Large squads that prevent water wastage are only on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.