Coastal Road Accident: मुंबईतील कोस्टल रोडवर वेगात असलेल्या लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात झाला. कुलाबाच्या दिशेने जात असलेल्या लॅम्बोर्गिनीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊन धडकली. यात कारचा समोरील भाग पूर्णपणे खिळखिळा झाला. सुदैवाने या अपघात कारचालका कोणतीही गंभीर इजा झाली नाही.
लॅम्बोर्गिनी कार अपघाताचा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला. रेमंड लिमिटेड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनीही हा व्हिडीओ शेअर करत चिंता व्यक्त केली.
लॅम्बोर्गिनी कार कोण चालवत होतं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील नेपियन सी रोड परिसरात राहणारे अतिश शाह हे लॅम्बोर्गिनी कार चालवत होते. कोस्टल रोडवरून ते दक्षिण मुंबईतील कुलाबाकडे निघाले होते. त्याच कार वेगात असतानाच त्यांचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर जाऊ आदळली.
लॅम्बोर्गिनी कार अपघाताचा व्हिडीओ
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये लॅम्बोर्गिनी कार वेगात असताना अचानक दुभाजकावर जाऊन आदळताना दिसत आहे. त्यामुळे कारचे बोनटचे प्रचंड नुकसान झाले आहे. कारला नंतर टो करून नेण्यात आले.
वरळी पोलिसांनी आरटीओ कार्यालयाला कारची तपासणी करण्यास सांगितले आहे. कारमध्ये काही बिघाड झाला होता का? याचीही तपासणी केली जाणार आहे. प्राथमिक तपासानुसार पोलिसांनी सांगितले की, रस्त्यावर पाणी होते, त्यामुळे कारच्या चाकांची पकड सुटली आणि अपघात झाला असावा. या प्रकरणी पोलिसांनी अतिश शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गौतम सिंघानिया म्हणाले, लॅम्बोर्गिनीला काय झालंय?
उद्योगपती गौतम सिंघानियांनी व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की, आणखी एक दिवस, आणखी एका लॅम्बोर्गिनीचा अपघात. मुंबईच्या कोस्टल रोडवर सकाळी ९.१५ वाजता. या कारला खरंच ट्रॅक्शन कंट्रोल आहे का? आग लागण्यापासून ते नियंत्रण जाण्यापर्यंत... लॅम्बोर्गिनीसोबत काय चाललं आहे?, असा प्रश्न त्यांनी या अपघातानंतर उपस्थित केला आहे.
ट्रॅक्शन कंट्रोल काय?
गौतम सिंघानियांनी ट्रॅक्शन कंट्रोलचा उल्लेख केला आहे. ट्रॅक्शन कंट्रोल ज्याला इंग्रजीमध्ये टीसीएस (Traction Control System) म्हटले जाते. ही कारमधील सुरक्षा प्रणाली असते. कारचे चाके घसरण्यापासून किंवा जास्त फिरण्यापासून रोखते. त्यामुळे चाके रस्त्यावरून घसरत नाहीत. ही सिस्टिम चाकांच्या वेगावर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर्सचाही वापर करते.