काल जवळपास ३३ तासांपूर्वी निघालेल्या लालबागच्या राजाचे आज रात्री ९ वाजता विसर्जन करण्यात यश आले. भरती येण्यापूर्वी पोहोचायची वेळ हुकल्याने लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले होते. सकाळी एकदा प्रयत्न करण्यात आला, परंतू पाणी खूप असल्याने तो थांबवण्यात आला होता. आता ओहोटी आल्यानंतर आधुनिक तराफ्यावर लालबागचा राजा चढविण्यात आला होता. परंतू, तराफा विसर्जनासाठी नेण्यास पुरेसे पाणी नसल्याने भरतीची वाट पाहिली जात होती. अखेर चंद्रग्रहण सुरु होण्यास काही मिनिटे शिल्लक असताना लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आहे.
ओहोटीच्या वेळी लालबागचा राजा तराफ्यावर घेतला जातो. त्यानंतर भरतीच्या वेळी तराफ्यावरुन विसर्जन केले जाते. परंतू, लालबागच्या राजाची मिरवणूक भरती सुरु झाल्यानंतर आली होती. पोहोचण्यासाठी १० ते १५ मिनिटांचा विलंब झाला आणि सर्व गणित बिघडले होते. यामुळे दिवसभर वाट पहावी लागली. यानंतर साडे आठ-नऊच्या सुमारास पुन्हा भरती सुरु झाली आणि स्वयंचलित तराफा पाण्यात जाण्यासाठी तयार झाला. अखेर ९ वाजता राजाचे विसर्जन करण्यात आले.
आज रात्री चंद्रग्रहण सुरु होणार आहे. दुपारपासूनच त्याचा सुतक काळ सुरु झाला आहे. रात्री चंद्रग्रहण रात्री ०९:५८ वाजता सुरू होईल आणि पहाटे ०१:२६ वाजता संपेल. चंद्र ग्रहण सुरु होण्याच्या तासभर आधीच लालबागच्या राजाचे विसर्जन झाले आहे.