मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या विसर्जनात यंदा प्रथमच अडथळे आले. अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता लालबाग राजाचे विसर्जन झाले. गिरगाव चौपाटीवर विसर्जनादरम्यान आलेली भरती आणि खास गुजरातहून विसर्जनासाठी आणलेल्या अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवताना झालेली कसरत यामुळे राजाच्या विसर्जनाला यंदा ३६ तासांपेक्षा अधिक काळ लागला. या सगळ्यामुळे भाविकांचे प्राण मात्र कंठाशी आले होते.
मुंबईकरांचा लाडका आणि नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ओळख आहे. यंदा ६ सप्टेंबरला सकाळी १० वाजता लालबागच्या राजाची मिरवणूक गिरगाव चौपाटीवर येण्यासाठी २२ तास लागले. त्यानंतर दीड-दोन तासांत विसर्जन होणे अपेक्षित होते.
राजाच्या विसर्जनासाठी यंदा खास स्वयंचलित तराफा गुजरातवरून आणण्यात आला. त्याची उंची जास्त असल्याने भरतीच्या लाटांत मूर्ती तराफ्यावर चढविणे मंडळासाठी अशक्य झाले. परिणामी मूर्ती कित्येक तास चौपटीवरच होती.
मंडळाला भरतीचा अंदाज नाही : वाडकर
वर्षानुवर्षे लालबागच्या विसर्जनाच्या सहभागी होणाऱ्या कोळी बांधवांनी यावर भाष्य करताना म्हटले की, काही कारणांमुळे ओहोटी-भरतीचा अंदाज लालबागचा राजा मंडळाला आला नाही. आम्ही वाडकर बंधू बरीच वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन करत आलो आहोत. मात्र काही कारणांमुळे राजाचे विसर्जन आता वाडकर बंधूंकडे नाही. गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागचा राजा मंडळाने हे कंत्राट त्यांना दिले आहे. पण यापुढे मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी दिली.
तराफ्यावरूनच विसर्जन
आजपर्यंत लालबागचा राजाच्या विसर्जनाला कधीही इतका वेळ लागला नव्हता. त्यामुळे यंदाच्या प्रकाराची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. यापूर्वी अनेक वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन हे कोळी बांधवांच्या मदतीने केले जात होते.
मात्र, यंदा विसर्जनासाठी गुजरातवरून आणलेला तराफा वापरला गेला. इतर सार्वजनिक मंडळांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी बोटी वापरण्यात आल्या. मात्र, लालबाग राजा मंडळाने तराफ्यावरूनच विसर्जन करायचे, हा निर्णय कामय ठेवला.
असा आहे तराफा
‘लालबागचा राजा’च्या विसर्जनासाठी यंदा गुजरातमध्ये तयार केलेला अत्याधुनिक मोटराइज्ड तराफा यंदा प्रथमच वापरण्यात आला. पूर्वीच्या तराफ्यापेक्षा याचा आकार दुप्पट असून याच्या तळाशी विशेष प्रोपेलर प्रणाली बसवण्यात आली आहे. लाटांचा वेग, दिशा लक्षात घेऊन स्थैर्य सांभाळताना हा तराफा स्वतःच नियंत्रण ठेवू शकतो.
सायंकाळी ४.३० च्या दरम्यान भरती कमी झाल्यानंतर राजाची मूर्ती असणारी ट्रॉली पुढे सरकली आणि ती तराफ्यावर ठेवण्यात मंडळाला यश आले. यादरम्यान तराफ्यावर विराजमान होण्याआधी भाविकांची धाकधूक वाढली होती. ‘मुंबईचा राजा’चे कार्यकर्तेही मदतीसाठी धावले.
आमचा विसर्जन सोहळा हा पूर्णपणे भरती आणि ओहोटीवर अवलंबून असतो. लालबागचा राजा हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे तराफ्यावर नेऊनच आम्ही विसर्जन करतो आणि आम्ही त्याच पद्धतीने विसर्जनाचा निर्णय घेतला. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि मुंबई पोलिस आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो. भरती लवकर आली आणि आम्हाला १५ मिनिटे उशीर झाला त्यामुळे पुढील अडचणींचा सामना करावा लागला.-सुधीर साळवी, मानद सचिव, लालबागचा राजा मंडळ