विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 16:09 IST2025-09-07T15:51:41+5:302025-09-07T16:09:34+5:30
Lalbaugcha Raja : २२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा आज सकाळी विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. पण अजूनही लालबागच्या राजाची मूर्तीचे विसर्जन झालेले नाही.

विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
Lalbaugcha Raja : गेले ११ दिवस उत्साहाने गणरायाची आराधना केल्यानंतर शनिवारी अनंत चतुर्दशी दिवशी मुंबई आणि महाराष्ट्रातील गणेशभक्तांनी लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप दिला. दरवर्षी लालबागच्या राजाचे विसर्जन दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंत होत असते. पण या वर्षी अजूनही लालबागचा राजाचे विसर्जन होऊ शकलेले नाही. गेल्या काही तासांपासून लालबागचा राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवरील समुद्रात बसून आहे. यंदा लालबागचा राजाचे विसर्जन करण्यासाठी स्वयंचलित आणि हायड्रोलिक्स यंत्रणा असलेला विशेष तराफ तयार करण्यात आला होता. यावरुन आता कोळी बांधवांनी मंडळावर आरोप केले आहेत.
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
दरम्यान, लालबागच्या राजाच्या विसर्जनावर गिरगाव चौपाटीवरील कोळी बांधव हिरालाल पांडुरंग वाडकर यांनी आरोप केले आहेत. "आज गिरगाव चौपाटीमध्ये लालबागच्या राजाचे विसर्जन अजूनही झालेले नाही. ओहोटी-भरतीचा अंदाज त्यांना आलेला नाही. आज काही कारणामुळे विसर्जन लवकर झालेले नाही. आम्ही वाडकर बंधू बऱ्याच वर्षापासून लालबागच्या राजाचे विसर्जन करत होतो. गुजरातचा तराफा आल्यामुळे त्यांनी हे कंत्राट त्यांना दिले आहे. यापुढे लालबागच्या राजा मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी, असंही हिरालाल पांडूरंग वाडकर म्हणाले.
२२ तास चालली मिरवणूक
सुमारे २२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाची स्वारी गिरगाव चौपाटीवर दाखल झाली आहे. येथे लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला आहे. आता काही वेळातच गिरगाव चौपाटीवरील खोल समुद्रात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार असून, त्यासाठी खास अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी, शनिवारी अनंत चतुर्दशीच्या पावसात लोक ढोल-ताशांसह आणि गुलालाच्या उधळणीसह रस्त्यावर गर्दी करून गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करत होते. मध्य मुंबईतील प्रतिष्ठित गणपती मंडळांसाठी प्रसिद्ध असलेल्या लालबाग येथून यात्रेला सुरुवात झाली, ज्यामध्ये तेजुकाया, गणेश गली आणि इतर अनेक मंडळांच्या मूर्ती होत्या. विसर्जन प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, बाल गणेश मंडळाचा बल्लाळेश्वर, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, काळाचौकीचा महागणपती, रंगारी बुडक चाळ गणपती आणि तेजुकाया गणपती यासारख्या प्रसिद्ध गणपतींच्या मिरवणुका दुपारी १ वाजेपर्यंत मुख्य रस्त्यावर पोहोचल्या होत्या. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत यापैकी काही प्रमुख गणपतींचं चौपाटीवरील खोल समुद्रात विसर्जन करण्यात आलं. तर लालबागचा राजा रविवारी सकाळी विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल झाला आहे.