मुंबई : लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे १५०० रुपये मानधन योग्यवेळी वाढविले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली. भाजपतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री व मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, आमदार मिहीर कोटेचा आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, काही जणांनी योजनेचा दुरुपयोग करून घुसखोरी केली आहे. अशांचे मानधन थांबवण्यात येईल. काही ‘हुशार’ भावांनी आपला फोटो लावण्याऐवजी मोटारसायकलचा फोटो लावला, जेणेकरून ओळख पटू नये. अशा घुसखोरांचे अनुदान आता थांबविण्यात आले आहे. प्रत्येकाची पडताळणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच पात्र असूनही अन्याय झालेल्या भगिनींवरील अन्याय दूर केला जाईल.
बचत गटांद्वारे तयार झाल्या २५ लाख लखपतीदीदी
विरोधकांवर टीका करताना त्यांनी सांगितले की, आधी त्यांनी लाडकी बहीण योजना लागू होऊ नये म्हणून अडथळे आणले. आता ते भ्रष्टाचाराच्या आरोपांची ओरड करत आहेत. भ्रष्टाचार योजनेत नाही, तो त्यांच्या डोक्यात आहे. योजनेबद्दल त्यांना असूया आहे.
फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील बचत गटांद्वारे २५ लाख लखपतीदीदी तयार झाल्या आहेत. यंदा आणखी २५ लाख लखपतीदीदी होतील आणि पुढील काही वर्षांत ही संख्या एक कोटीच्या घरात जाईल. लखपतीदीदी योजनेत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. मुलींसाठी केजी ते पीजी शिक्षण मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळावी, यासाठी पहिल्या टप्प्यात दहा मॉल उभारले जात आहेत.
मुलुंडच्या कालिदास नाट्यमंदिरातील कार्यक्रमात काही भगिनींनी फडणवीस यांना राख्या बांधल्या. माजी मंत्री प्रकाश मेहता, आमदार पराग अळवणी, माजी खासदार मनोज कोटक, ईशान्य मुंबई भाजप अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार श्याम सावंत आदी उपस्थित होते.