लाडकी बहीण, धनंजय मुंडेंचा राजीनामा, स्वारगेट प्रकरण अधिवेशनात गाजणार; मविआची जय्यत तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 06:17 IST2025-03-03T06:15:37+5:302025-03-03T06:17:07+5:30
सरकारकडे बहुमत आणि विरोधकांकडे कमी संख्याबळ असले तरी सरकारला घाम फोडण्याची तयारी मविआने केली आहे.

लाडकी बहीण, धनंजय मुंडेंचा राजीनामा, स्वारगेट प्रकरण अधिवेशनात गाजणार; मविआची जय्यत तयारी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : महायुती सरकार शेतकरीविरोधी असून तीन बाजूंनी तीन तोंडे असलेले विसंवादी सरकार आहे. जनतेला न्याय देण्याची भूमिका बजावण्याऐवजी सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाला सापत्न वागणूक दिली आहे, त्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याची महाविकास आघाडीची भूमिका असल्याची माहिती विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारकडे बहुमत आणि विरोधकांकडे कमी संख्याबळ असले तरी सरकारला घाम फोडण्याची तयारी मविआने केली आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दानवे यांच्या अजिंक्यतारा या शासकीय निवासस्थानी मविआच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर टीका करण्यात आली. यावेळी उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, प्रतोद सुनील प्रभू, आमदार भास्कर जाधव, काँग्रेसचे विधिमंडळ उपनेते आमीन पटेल, आमदार भाई जगताप, शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे आमदार शिरीष कुमार नाईक उपस्थित होते.
या मुद्द्यांवर घेरणार
स्वारगेट अत्याचार प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी आघाडी सरकारने शक्ती विधेयक संमत करून मंजुरीसाठी केंद्र सरकारला पाठवले होते, मात्र ते केंद्र सरकारने परत पाठविल्यावरून विरोधी पक्षाकडून अधिवेशनात सरकारला जाब विचारला जाईल, असे दानवे, आव्हाड, जाधव, जगताप यांनी सांगितले.
माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यातील घोटाळे उघड केले आहेत. मात्र मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घेतलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही मंत्री विरोधकांचे लक्ष्य राहतील, असे संकेत मविआच्या नेत्यांनी दिले.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या छाननीअंती नऊ लाखांपर्यंत बहिणी अपात्र ठरल्या. यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे.