Join us  

लडाख, डोकलामची स्थिती युक्रेनसारखी; सरकार गप्पच: केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 8:13 AM

राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल : मोदींच्या द्वेषातून टीका – भाजप

लंडन : लडाख व डोकलाममध्ये युक्रेनसारखीच स्थिती आहे. चीनमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीबाबत मोदी सरकार कोणतीही कारवाई करताना, तसेच चकार शब्द काढताना दिसत नाहीत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केली. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पराकोटीच्या द्वेषापायी  राहुल गांधी विदेेशात जाऊन भारताच्या विरोधात विधाने करत आहेत. ते अशा कृत्यांद्वारे भारताशी विश्वासघात करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठामध्ये ब्रिज इंडिया या संस्थेच्या वतीने आयोजित ‘आयडियाज ऑफ इंडिया’ या कार्यक्रमात शुक्रवारी राहुल गांधी बोलत होते. त्यांनी सांगितले की, लडाख, डोकलामच्या प्रदेशात चीनचे सैन्य आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे. चीनचा अरुणाचल प्रदेश व लडाखवर डोळा आहे. भारताच्या सीमा भागात मोठे संकट निर्माण झाले आहे, हे आधी आपण मान्य केले पाहिजे व त्यावर तोडगा शोधण्यासाठी हालचाली केल्या पाहिजेत.

राहुल गांधी म्हणाले की, पॅगाँग तलावावर चीनने मोठा पूल बांधला आहे. ते त्या भागात आणखी काही बांधकामे करत आहेत. ही स्थिती भारतासाठी अतिशय वाईट आहे. मला देशाची काळजी वाटते. त्यामुळेच चीनने निर्माण केलेल्या संकटाचा विषय मी सतत उपस्थित करतो. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले की, राहुल गांधी हे पार्टटाइम, अपरिपक्व व अपयशी नेते आहेत. ते विदेशात जाऊन भारताच्या विरोधात वक्तव्ये करतात. देशहितासाठीच भारतीय परराष्ट्र सेवेच्या धोरणांमध्ये आता मोठा बदल करण्यात आला. या सेवेबद्दल राहुल गांधी यांनी केलेली टीका अयोग्य आहे, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी म्हटले आहे.  

भाजपच्या धोरणांचा मूठभर लोकांनाच फायदा

n    काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भारतामधील लोकांमध्ये सुसंवाद असावा असे आम्हाला वाटते. n    भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मात्र भारत म्हणजे ‘सोने की चिडिया’ वाटतो.n    त्याचे फायदे देशातील मुठभर लोकांनाच मिळावेत अशी भाजपची धारणा व धोरणे आहेत. त्यामुळे असमानतेची दरी वाढली आहे.n    देशातील प्रत्येक नागरिकाला समान संधी मिळावी या तत्वावर काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचा विश्वास आहे.

भाजपचे काम आग लावण्याचे

n    राहुल गांधी म्हणाले की, भाजप जणू देशभर रॉकेल शिंपडून आग लावण्याचे काम करत आहे.n    कुठेतरी एक ठिणगी पडल्यास सारा देश संकटात येऊ शकतो.

टॅग्स :राहुल गांधीनरेंद्र मोदीलडाख