मुंबई : अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारने दिलेल्या धडकेत एक मजूर ठार, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना कांदिवली पूर्व येथे घडली आहे. या घटनेत मागच्या सीटवर बसलेल्या उर्मिला हिला देखील किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी कारचालक गजानन पाल (५८) याला समतानगर पोलिसांनी अटक केली आहे.
सम्राट दास (२४) असे या मृत मजुराचे नाव आहे. तर, त्याचा सहकारी कामगार सुजन दास (२४) हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोन्ही मजूर गोरेगावचे रहिवासी आहेत.
पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी उत्तररात्री १ वाजता उर्मिला शूटिंगवरून घरी परतत असताना पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मेट्रो स्टेशनजवळ तिची कार आली असताना चालक पाल याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याने दोन मजुरांना धडक दिली.
कार चालकाला अटकपश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाणाऱ्या भूमिगत पाइपच्या कामाच्या ठिकाणी हे दोन्ही मजूर काम करत होते. त्यातील सम्राट दास याचा मृत्यू, तर सुजन दास हा गंभीर जखमी झाला. तर कारमध्ये मागील सीटवर बसलेल्या उर्मिलाच्या हनुवटीला जखम झाली आहे. कारचालक पाल याला अटक करण्यात आली आहे.