कुर्लावासीयांना घरात बसवेना, बाजारपेठांत गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:06 AM2021-05-10T09:06:37+5:302021-05-10T09:07:17+5:30

मुंबई : कोरोनाबाधितांचे आकडे काहीसे कमी होऊ लागल्यापासून मुंबईतील बाजारपेठांमधील गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. कुर्ला पश्चिमेकडील सर्व लहान- ...

Kurla residents do not stay at home, the markets are crowded, the fuss of social distance | कुर्लावासीयांना घरात बसवेना, बाजारपेठांत गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कुर्लावासीयांना घरात बसवेना, बाजारपेठांत गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

Next

मुंबई : कोरोनाबाधितांचे आकडे काहीसे कमी होऊ लागल्यापासून मुंबईतील बाजारपेठांमधील गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. कुर्ला पश्चिमेकडील सर्व लहान- मोठ्या मार्केटमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे.
कुर्ल्यातील यादव मंडईत रविवारी ग्राहकांची झुंबड उडाली. पालिकेच्या एल विभागाचे कार्यालय येथून हाकेच्या अंतरावर आहे; परंतु रविवारच्या सुटीमुळे कोणताही अधिकारी येऊन कारवाई करणार नाही, याची खात्री असल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याचे दिसून आले. शासनाने निर्बंधांच्या काळात केवळ दैनंदिन गरजेच्या वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, येथील बहुतांश सर्व दुकाने राजरोसपणे खुली होती.
सकाळी साडेनऊनंतर गर्दी आणखी वाढत गेली. ‘दो गज की दुरी, मास्क है जरुरी’ या घोषवाक्याला पूर्णतः हरताळ फासल्याचे चित्र जागोजागी दिसून येत होते. सोशल डिस्टन्सिंग किंवा मास्क परिधान करण्याचे भानही कोणालाही नव्हते. हौशी तरुण तर फेरफटका मारण्याच्या उद्देशानेच बाहेर पडले होते. शासनाच्या निर्देशानुसार सकाळी ७ ते ११ या वेळेत खरेदीसाठी मुभा असल्याने पोलीसही या परिसरात फिरकले नाहीत. ११ नंतर पोलिसांची गाडी दिसली तेव्हा आलेल्यांनी घराच्या दिशेने धूम ठोकली.

नुसते आवाहन किती दिवस करत बसायचे?
शासनाचे अधिकारी दररोज गर्दी करू नका असे आवाहन करीत असतात; पण कोणीही त्यांचे ऐकत नाही. कुर्ल्यातील बाजारपेठा, नाके, बसस्टॉपवरील गर्दी अद्यापही कमी झालेली नाही. लॉकडाऊन लावल्यानंतरही नागरिक मुक्त संचार करताना दिसतात. नाक्यांवर गप्पांचे फड पूर्वीसारखेच रंगतात. नागरिकांना नुसते आवाहन किती दिवस करीत बसणार, ठोस कारवाई केल्याशिवाय गर्दी नियंत्रणात येणार नाही, असे मत कुर्ल्यातील सामाजिक कार्यकर्ते गुणवंत दांगट यांनी व्यक्त केले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kurla residents do not stay at home, the markets are crowded, the fuss of social distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app