गुन्हा रद्द करण्यासाठी कुंद्रा, शिल्पा शेट्टी काेर्टात,६० कोटींच्या फसवणूक प्रकरण मुंबईत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 09:56 IST2025-11-11T09:56:11+5:302025-11-11T09:56:39+5:30
Shilpa Shetty-Raj Kundea: अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (ईओडब्ल्यू) विरोधात ६० कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

गुन्हा रद्द करण्यासाठी कुंद्रा, शिल्पा शेट्टी काेर्टात,६० कोटींच्या फसवणूक प्रकरण मुंबईत गुन्हा दाखल
मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा व्यावसायिक पती राज कुंद्रा यांच्याविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून (ईओडब्ल्यू) विरोधात ६० कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
गुन्हा रद्द करण्याबरोबरच, या दाम्पत्याने पोलिसांना आरोपपत्र दाखल न करण्याची आणि त्यांच्या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, अशी विनंती न्यायालयाला केली आहे.
मुख्य न्या. श्री चंद्रशेखर आणि न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या याचिकांवर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने या दाम्पत्याला तक्रारदार दीपक कोठारी यांना त्यांच्या याचिकांची प्रत देण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणी २० नोव्हेंबर रोजी केली.
कोठारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, २०१५ ते २०२३ दरम्यान शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी त्यांना त्यांच्या कंपनी ‘बेस्ट डील टीव्ही प्रा. लि.’ मध्ये ६० कोटी रुपये गुंतवण्यास प्रवृत्त केले, परंतु त्यांनी हा निधी वैयक्तिक फायद्यासाठी वापरला.
पैसे उकळण्याचा हेतू; याचिकेत केला आराेप
गुन्हा दुर्भावनापूर्ण भावनेने दाखल केला असून खोट्या माहितीवर आधारित आहे. पैसे उकळण्याच्या हेतूने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे याचिकेत म्हटले आहे. तर शिल्पा शेट्टीने याचिकेत म्हटले आहे की, ती कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी नव्हती आणि तिचा त्या कंपनीशी अत्यंत मर्यादित कालावधीसाठीच संबंध होता.
संपूर्ण वाद नागरी आणि कराराधारित स्वरूपाचा असून, तो एका अयशस्वी व्यावसायिक उपक्रम आणि गुंतवणुकीतील नुकसानीतून उद्भवलेला आहे. कंपनीचे नुकसान कोणत्याही फसवणुकीमुळे नव्हे तर २०१६ च्या नोटाबंदीमुळे झाला.
अनपेक्षित आर्थिक परिस्थिती आणि रोखीवर चालणाऱ्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला, असे याचिकेत म्हटले आहे. झालेले नुकसान हे केवळ व्यावसायिक तोटे होते, त्यामागे कोणताही फसवणुकीचा हेतू किंवा गुन्हेगारी कट नव्हता, असेही याचिकेत नमूद केले आहे.