Join us

"कामरा संविधानाचे पुस्तक दाखवतोय, त्याला माहिती पाहिजे..."; वादग्रस्त गाण्यावर CM फडणवीसांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 11:43 IST

एकनाथ शिंदेंचा अपमान करणाऱ्या कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis on Kunal Kamra Controversy: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाणे की रिक्षा या गाण्यातून टीका करणाऱ्या स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामरा याने त्याच्या गाण्यातून एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक टीका केली. कामराच्या या गाण्यावरुन शिंदेचे शिवसैनिक संतापले असून त्यांनी कामराला धडा शिकवण्याची मागणी केली आहे. संतप्त शिवसैनिकांनी ज्या क्लबमध्ये हा शो झाला त्याची तोडफोड देखील देखील केली. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या वादावर प्रतिक्रिया देताना कुणाल कामराने माफी मागायला हवी असं म्हटलं.

कुणाल कामराने त्याच्या वादग्रस्त गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. कुणाल कामराच्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिंदेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहे. शिंदे गटातील नेत्यांनी कामराविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कामरा प्रकरणावर भाष्य केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

"कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने दाखवून दिलं आहे. कोणाकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या बद्दल जनतेच्या मनात आदर आहे त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचे आहे तुम्ही कॉमेडी करा पण जर अपमानित करण्याचं काम कोणी करत असेल तर हे सहन केलं जाणार नाही. कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. ते संविधानाचे पुस्तक दाखवत आहे. त्यांनी जर ते वाचलं असेल तर संविधानाने सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नियमाच्या बाहेर कुणीच जाऊ नये - उपमुख्यमंत्री अजित पवार

"खरं तर कायदा, संविधान आणि नियम याच्या बाहेर कुणीच जाऊ नये. तुम्हाला मला जनतेला संविधानाने जेवढा अधिकार दिला आहे त्याचा वापर करुन बोललं पाहिजे. प्रत्येकाची वक्तव्ये वेगवेगळी असू शकतात. विचारधारा वेगवेगळी असू शकते. मतमतांतर असू शकतं. पण ते मांडतांना आणि त्याची चर्चा होताना त्याच्यातून नवीन प्रश्न निर्माण होऊन पोलीस खात्याला वेगळी कायदा सुवस्था राखण्याच्या परिस्थिती निर्माण होणार नाही याची पण काळजी प्रत्येक जबाबदार नागरिकाने घेतली पाहिजे," असं अजित पवार म्हणाले. 

टॅग्स :कुणाल कामराएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस