कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 10:03 IST2025-04-17T10:01:18+5:302025-04-17T10:03:32+5:30
दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान ट्रस्टद्वारे दरवर्षी मान्यवरांना सन्मानित केले जाते. यावेळी मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही जाहीर करण्यात आले.

कुमार मंगलम बिर्ला यांना लता मंगेशकर पुरस्कार, श्रद्धा कपूर, सोनाली कुलकर्णीचाही होणार सन्मान
मुंबई : यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी आणि भारताच्या विकासातील योगदानासाठी जाहीर करण्यात आला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ २०२२ मध्ये सुरू केलेल्या या प्रतिष्ठित पुरस्काराने यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आशा भोसले आणि अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आले आहे.
दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान ट्रस्टद्वारे दरवर्षी मान्यवरांना सन्मानित केले जाते. यावेळी दीनानाथ मंगेशकर पुरस्कारही जाहीर करण्यात आले.
अभिनेते-दिग्दर्शक सचिन पिळगावकर, अभिनेते शरद पोंक्षे यांनाही सन्मानित केले जाणार आहे. व्हायोलिनवादक पद्मभूषण डॉ. एन. राजम यांनाही सन्मानित केले जाणार आहे. पुरस्काराचे वितरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.
दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व्या स्मृतिदिनानिमित्त २४ एप्रिलला विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात हा सोहळा होणार आहे.
‘असेन मी नसेन मी’ सर्वोत्कृष्ट नाटक
साहित्यिक श्रीपाल सबनीस यांना त्यांच्या चिरस्थायी साहित्यिक योगदानासाठी वाग्विलासिनी पुरस्कार प्रदान केला जाईल. सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या ‘आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम अँड स्लो लर्नर चिल्ड्रन’ला अथक कार्याबद्दल सन्मानित केले जाणार आहे.
स्क्रिप्टिस क्रिएशन आणि रंगाई प्रॉडक्शन यांच्या ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला वर्षातील सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार देण्यात येणार आहे.
रिवा राठोडचाही करणार सन्मान
भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभावी योगदानाबद्दल अभिनेत्री श्रद्धा कपूर, नाटक आणि चित्रपटक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल सोनाली कुलकर्णी, हिंदी चित्रपटातील कामगिरीबद्दल अभिनेते सुनील शेट्टी यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख नाव रिवा राठोडलाही सन्मानित करण्यात येणार आहे.