Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा हिंसाचार : पोलीस जबाबदार, शरद पवारांची आयोगासमोर साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 05:37 IST

संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना व्यक्तिश: ओळखत नसून, केवळ माध्यमांद्वारे त्यांची नावे समजल्याचे पवार यांनी आयोगाला सांगितले.

मुंबई : पुणे जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या कोरेगाव भीमा हिंसाचारास तत्कालीन सरकारचे अपयश आहे का? या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेसाठी पोलिसांना जबाबदार धरले. यंत्रणांचा वापर करण्यात पोलीस अपयशी ठरले. ही घटना दुर्दैवी होती व अशा घटना नियंत्रणात आणण्याचे काम पोलिसांचे आहे. कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीस जबाबदार असतात, असे उत्तर पवार यांनी कोरेगाव भीमा दंगलीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाला दिले.

कोरेगाव भीमा येथे २०१८ मध्ये दंगल झाल्यावर शरद पवार यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांना चौकशी आयोगाने साक्ष नोंदविण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. चौकशी आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल आणि सदस्य सुमित मलिक यांच्यासमोर पवार यांनी आपले म्हणणे मांडले. 

वक्तव्य केल्यानंतर होणाऱ्या परिणामांना संबंधित व्यक्तीच जबाबदार असून, जबाबदारीचे भान ठेवूनच वक्तव्य करायला हवे; अन्यथा त्या वक्तव्यातून उमटलेल्या प्रतिक्रियेची जबाबदारी त्या व्यक्तीला टाळता येणार नाही. आपल्या भाषणात चिथावणी देणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे काहीही नसावे. समाजातील शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे काहीही नसावे, याची खबरदारी घेण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. निदर्शने, आंदोलने यासाठी लोकांच्या सोईची जागा निश्चित केली, तर योग्य होईल. आंदोलन हिंसक झाले, तर पोलिसांना त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असेही शरद पवार यांनी आयाेगापुढे स्पष्ट केले. 

संभाजी भिडेंना व्यक्तिश: ओळखत नाहीवंचितांच्या व्यथा, त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत भाषणांतून मांडणे, हे माझ्या दृष्टीने राष्ट्रविरोधी नाही आणि गुन्हाही नाही, असे पवार यांनी स्पष्टपणे म्हटले. संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना व्यक्तिश: ओळखत नसून, केवळ माध्यमांद्वारे त्यांची नावे समजल्याचे पवार यांनी आयोगाला सांगितले.

टॅग्स :कोरेगाव-भीमा हिंसाचारशरद पवारसंभाजी भिडे गुरुजीमिलिंद एकबोटे