Join us  

कोकण मंडळ सदनिका सोडत २०१८ : पात्रता निश्चितीच्या विशेष मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 6:04 PM

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ऑगस्ट २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीकरिता आवश्यक पुरावे/कागदपत्रे सादर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेस पहिल्याच दिवशी अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 मुंबई - कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ऑगस्ट २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीकरिता आवश्यक पुरावे/कागदपत्रे सादर करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेस पहिल्याच दिवशी अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून  एकूण २०१ यशस्वी अर्जदारांनी कागदपत्रे सादर केली त्यापैकी ३८ अर्जदारांची पात्रता निश्चिती करण्यात आली असून  १२९   अर्जदारांनी टोकन नोंदविले आहे.

        वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  ही विशेष मोहीम ८ फेब्रुवारी , २०१९ पर्यंत राबविली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत ऑगस्ट २०१८ च्या सदनिका विक्री सोडतीतील संकेत क्रमांक २७४ विरार बोळींज (अल्प उत्पन्न गट) व संकेत क्रमांक २७६ बाळकूम ठाणे (मध्यम उत्पन्न गट) या योजनेतील सर्व यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे.  तसेच कोंकण मंडळातर्फे ऑगस्ट महिन्यात आयोजित पहिल्या टप्प्यातील विशेष मोहिमेत जे अर्जदार सहभाग घेऊ शकले नाहीत अशा अर्जदारांकरिता ही संधी कोंकण मंडळातर्फे उपलब्ध करवून देण्यात आली आहे. 

या विशेष मोहिमेत सहभागी होण्यासाठी  अर्जदारांना ८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सकाळी ११ ते  दुपारी ३ वाजे दरम्यान वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयातील मित्र कक्षातून टोकन दिले जाणार आहे.२१ जानेवारी  पासून टोकन नोंदणी सुरु करण्यात आल्या नंतर अद्यापपर्यंत ११४० अर्जदारांनी टोकन घेतले आहे .   कोंकण मंडळातर्फे राबविण्यात आलेली हि विशेष मोहीम यशस्वी अर्जदारांकरिता सुवर्ण संधी असून अधिकाधिक अर्जदारांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा,  असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी केले आहे.   

 या टोकन क्रमांकासह अर्जदारास आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट दिली जाणार आहे. टोकन मिळवण्यासाठी अर्जदाराने सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जाची प्रत व स्वतःचे ओळखपत्र सोबत आणावे. पात्रतेसाठी आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट म्हाडाचे अधिकृत संकेत स्थळ   https://mhada.gov.in वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे.  या कालावधीत अर्जदाराने पात्रतेसंबंधी लागणारे कागदपत्रे / पुरावे सादर न केल्यास भविष्यात यशस्वी अर्जदाराला मंडळातर्फे पुन्हा संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही व संबंधितांचा अर्ज रद्द करून नियमानुसार प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

टॅग्स :म्हाडाघरकोकण