Join us

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल; चार दिवसांनंतरही पदरी निराशाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 13:25 IST

गणपतीला कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकिट तिकीट आम्हाला मिळत नाही, तर नेमके कोण बुक करत आहे? असा सवाल चारकारमानी विचारत आहेत.

- महेश कोले, मुंबईगणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकिट मिळावे, म्हणून चाकरमान्यांनी गेल्या चार दिवसांपासून दादर, भांडुप, विक्रोळी आणि ठाणे रेल्वे स्टेशनवरील तिकिट खिडक्यांवर रांगा लावल्या होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळी ८ वाजता कोकण रेल्वेचे बुकिंग सुरू झाले आणि अवघ्या दोन मिनिटांत कोकणात जाणाऱ्या सगळ्याच रेल्वे गाड्या फुल्ल झाल्या. यात रांगेतील पहिल्याच प्रवाशाला कन्फर्म तिकिट मिळाले, तर दुसऱ्याला आरएसीवर समाधान मानावे लागले. इतरांच्या वाट्याला वेटिंग तिकिटही न आल्याने संताप व्यक्त होत आहे.

गणपतीला कोकणात जाण्यासाठी रेल्वेचे तिकिट तिकीट आम्हाला मिळत नाही, तर नेमके कोण बुक करत आहे? असा सवाल चारकारमानी विचारत आहेत. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागामध्ये १२६ तिकिट आरक्षण खिडक्या असून, या सर्व ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे तिकिट विक्री  बंद कराव्यात, असे चाकरमान्यांचे म्हणणे आहे.

गाड्यांची संख्या घटली, तरी वेटिंग कोटा केवळ २५ टक्केच 

मध्य रेल्वेने सांगितल्यानुसार कोकण रेल्वेने मागणी केल्यास दिव्यावरून ५०० पेक्षा अधिक विशेष गाड्या चालविण्याची मध्य रेल्वेची तयारी आहे, परंतु कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकामुळे सुरक्षेच्या करणास्तव गाड्यांची संख्या कमी आणि धिमी करण्यात येते. तसेच, वेटिंग तिकिटाचा कोटा ट्रेनच्या एकूण कोट्यापेक्षा २५ टक्के ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, रांगेत कोणालाही वेटिंग तिकिट मिळत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

प्रवाशांची रेल्वे प्रशासनावर आगपाखड

‘लोकमत’ने शुक्रवारी ठाणे स्थानकातील प्रवाशांशी संवाद साधला. अनेक प्रवासी तिकिट मिळवण्यासाठी सलग चार दिवस रांग लावत असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे स्थानकातील आरक्षण केंद्रावर ८ तिकिट खिडक्या असून, प्रत्येक खिडकीवर किमान १० ते १२ प्रवासी रांगेत उभे होते.

तिकिट खिडकी सकाळी ८ वाजता सुरू झाली. परंतु, रांगेत असलेल्या केवळ पहिल्याच प्रवाशाला कन्फर्म तिकिट मिळाले, तर त्या मागच्या एका प्रवाशाला आरएसी तिकीट मिळाले. केवळ २ मिनिटांमध्ये सर्व तिकिट संपल्याने  रांगेतल्या प्रवाशांचा रेल्वे प्रशासनावर रोष पाहायला मिळाला. दादर आणि भांडुप स्थानकांत देखील अशीच काहीशी परिस्थिती होती. 

मुलांच्या शिक्षणामुळे आणि कामामुळे गणपतीच्या पहिल्या दिवशी पोहोचण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी ४ दिवसांपासून रांगेत थांबूनही तिकिट मिळत नाही. आता मिळेल त्या गाडीचे तिकीट काढण्याचा प्रयत्न केला, पण ते सुद्धा मिळत नाही. रेल्वेने आता तिकिट विक्री करण्यापेक्षा काउंटर बंद करावे.वैशाली दळवी, चाकरमानी 

गेली तीन दिवस मी आणि मुलगा इथे रांगेत पाळी पाळीने थांबत आहोत. एवढे करून सुद्धा आरएसी तिकिट मिळाले आहे. त्यामुळे आता कसे तरी धडपडत का होईना जावे लागणार.रघुनाथ वारंग, चाकरमानी

टॅग्स :कोकण रेल्वेकोकणगणेशोत्सव 2024गणेश चतुर्थी २०२४