Join us  

तौक्ते वादळातील अपघातग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाचा मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2021 2:47 PM

कोकण किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचे खूप नुकसान झालेले आहे.

मुंबई: मुंबईतील माहीम कोळी वाडा व खार दांडा कोळीवाड्यातील तौक्ते वादळातील अपघातग्रस्त मच्छिमारांना कोळी महासंघाच्या वतीने आर्थिक मदत व अन्न धान्य वाटप करून मदतीचा हात दिला. येथील ज्या मच्छीमार बांधवांच्या बोटी नष्ट झालेल्या आहेत अशा बोट मालकांना कोळी महासंघ व भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार रमेश  पाटील यांनी माजी शिक्षण मंत्री अँड.अशिष शेलार यांच्या शुभ हस्ते धनादेश वाटप करून आर्थिक सहाय्य केले.

 यावेळी कोकण किनारपट्टीवर तोक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्याकरिता आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत असून  राज्यपाल महोदयानाहीं आम्ही याबाबतचे निवेदन देवून मच्छिमार बांधवांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली व मच्छीमार बांधवांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तात्काळ मदत करण्यास सांगितले असल्याचे आमदार रमेश दादा यांनी लोकमतला सांगितले.याप्रसंगी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी,  सरचिटणीस राजहंस टपके,  भाजपाच्या मच्छिमार सेलचे अध्यक्ष अँड. चेतन पाटील , माजी नगरसेवक विलास चावरी, चिंतामणी निवटे तसेच कोळी महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

कोकण किनारपट्टीवर गेल्या आठवड्यात झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमार बांधवांचे खूप नुकसान झालेले आहे. या चक्रीवादळामुळे  मच्छिमार बांधव अडचणीत सापडला आहे कित्येक मच्छीमारांचे कुटुंब उध्वस्त झालेले आहेत ,परंतु अशा वेळी सरकारने मच्छिमार बांधवांना मदत करणे गरजेचे असताना अजून पर्यंत सरकार कडून मच्छिमार बांधवांना कोणतीही ठोस मदत करण्यास आलेली नाही. कित्येक मच्छीमारांच्या बोटीचे, घरांचे नुकसान झालेले आहेत तसेच काही मच्छीमार या चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडले आहेत अशा मच्छीमारांना कोणतीही मदत करण्यात आलेली नाह. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी सुद्धा मच्छिमार बांधवांना सरकारने मदत केलेली नसून सरकार मच्छीमारांना फक्त आश्वासन देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे असा आरोप आमदार रमेश पाटील यांनी केला.

कित्येक वर्षापासून राज्यातील मच्छीमारांचा डिझेल परतावा सरकारकडे प्रलंबित आहे. आधीच कोरोनाच्या महामारीमुळे मच्छीमार व्यवसाय संकटात सापडला आहे ऐन मोसमाच्या काळात झालेल्या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव देशोधडीला लागलेला असताना सरकार मच्छीमार बांधवांना कोणतीच मदत करत नसल्याचे आमदार रमेश दादा म्हणाले. कोळी महासंघाने किनारपट्टीवरील तोक्ते चक्री वादळांमुळे झालेल्या नुकसानीची  पाहाणी केली. यावेळी मच्छिमार बांधवांचे नुकसान झाल्याचे आढळून आल्याने या मच्छीमार बांधवांना धनादेश व धान्य वाटप केल्याची माहिती अँड.चेतन पाटील यांनी दिली.

टॅग्स :तौत्के चक्रीवादळभाजपामुंबई