“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:09 IST2025-12-24T15:09:03+5:302025-12-24T15:09:03+5:30
Kishori Pednekar News: ठाकरे बंधूंच्या युतीनंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच उत्साह संचारल्याचे पाहायला मिळत आहे.

“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
Kishori Pednekar News: अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-मनसेची युती अधिकृतपणे जाहीर केली. अवघ्या राजकीय वर्तुळाचे आणि राज्याचे लक्ष याकडे लागले होते. मुंबईचा महापौर मराठी व्यक्तीच होणार आणि तो आमचाच असेल, असे राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले. ठाकरे बंधूंनी जागावाटपाबाबत अधिक माहिती उघड केली नाही. यातच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मोठा विश्वास व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणकेर या दक्षिण मुंबईतून निवडून आल्या होत्या. त्यानंतर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्या. यंदा ठाकरे गटाने ज्येष्ठ नेत्यांऐवजी तरुण चेहऱ्यांना प्राधान्य देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याला उमेदवारी मिळणार असल्याचा मोठा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार
मी १०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार आहे. मी स्वत: रणंगणात असेन. ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत १३० पेक्षा अधिक जागा जिंकतील. भाजपावाले आमच्यावर आरोप करत आहेत. आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आम्ही काय काम केले, हे मुंबईकरांना माहिती आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ठाकरे बंधूंच्या युतीच्या अधिकृत घोषणेनंतर भाजपाने टीका केली असून, काँग्रेसने शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर आक्रमक शब्दांत टीकास्त्र सोडले.