मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, तर उपमहापौरपदी सुहास वाडकर विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 12:24 PM2019-11-22T12:24:32+5:302019-11-22T12:41:55+5:30

विद्यमान महापौर, उपमहापौर यांचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात आला. त्यानुसार मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज पालिका मुख्यालयात निवडणूक झाली.

Kishori Pednekar as Mayor of Mumbai and Suhas Wadkar as Deputy Mayor | मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, तर उपमहापौरपदी सुहास वाडकर विराजमान

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर, तर उपमहापौरपदी सुहास वाडकर विराजमान

googlenewsNext

मुंबई - विद्यमान महापौर, उपमहापौर यांचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात आला. त्यानुसार मुंबईच्या महापौर व उपमहापौरपदासाठी आज पालिका मुख्यालयात निवडणूक झाली. या निवडणुकीत मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने उमेदवार उभा न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानुसार महापौरपदी सेनेच्या किशोरी पेडणेकर आणि उपमहापौरपदी सुहास वाडकर यांच्या नावावर पालिकेच्या महासभेत शिक्कामोर्तब झालं. महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे सेनेत इच्छुक ज्येष्ठ नगरसेवकांत रस्सीखेच सुरू होती. मात्र वरळी मतदारसंघात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विजयात मोठे योगदान असलेल्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना पक्षाने संधी दिली. राज्यात सेनेबरोबर सत्तेचे गणित जुळत असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला उमेदवार उभा केला नाही. भाजपानेही ऐनवेळी माघार घेतली.

शर्यतीत कोणताच राजकीय स्पर्धक नसल्याने सर्वाधिक तुल्यबळ शिवसेनेचाच महापौर व उपमहापौर झाला आहे. महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षे असतो. 2017मध्ये सत्तेत आल्यावर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर महापौरपदी तर हेमांगी वरळीकर उपमहापौरपदी निवडून आल्या होत्या. शिवसेनेत इच्छुक ज्येष्ठांमध्ये महापौरपदासाठी रस्सीखेच सुरू होती. नगरसेवकांनी मातोश्रीवर लॉबिंग सुरू केले होते. यशवंत जाधव, मंगेश सातमकर, रमाकांत रहाटे, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर यांची नावे या शर्यतीत होती. महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात शिवसेना सचिव अनिल परब यांनी बैठकीत पेडणेकर यांचे नाव जाहीर केले. त्यानंतर, पेडणेकर यांना उमेदवारी अर्ज मिळाला आणि त्या बिनविरोध निवडून आल्या. तर उपमहापौरपदी सुहास वाडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. १९५५  सुलोचना मोदी, १९९८ नंदकुमार साटम आणि आणि २०१९ किशोरी पेडणेकर महापौरपदावर बिनविरोध निवड झाली.

उपमहापौरपदी सुहास वाडकर
मालाड, कुरार व्हिलेज येथील नगरसेवक सुहास वाडकर यांची उपमहापौरपदासाठी निवड जाहीर झाली आहे. २०१७ मध्ये वाडकर पहिल्यांदाच नगरसेवकपदी निवडून आले. या आधी त्यांनी विधि समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. वाडकर यांचे वडील चंद्रकांत वाडकर हेही शिवसेनेचे नगरसेवक होते.

महापौरपदी विराजमान होताच मुंबई खड्डेमुक्त व कचरामुक्त करीत स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी प्राधान्य देणार. पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन.
- किशोरी पेडणेकर (शिवसेनेच्या महापौर)
----------------
सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी काम करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवून दाखवेन.
- सुहास वाडकर (शिवसेनेचे उपमहापौर)

Web Title: Kishori Pednekar as Mayor of Mumbai and Suhas Wadkar as Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.