बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरू झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 06:13 IST2020-09-13T06:13:35+5:302020-09-13T06:13:58+5:30
संस्थेने आध्यात्मिकतेबरोबर सामाजिक प्रबोधनाची सांगड घातली असून, देश-विदेशात संस्थेचा लौकिक आहे.

बांबू-पत्र्याच्या छपराखाली सुरू झालेली कीर्तन संस्था झाली ८० वर्षांची
मुंबई : स्वातंत्र्यपूर्व काळात ज्यावेळी सामाजिक प्रबोधनासाठी कीर्तन आणि नाटक हीच दोन माध्यमे होती. त्यावेळी कीर्तन हे प्रभावी माध्यम होते आणि आजही प्रभावी आहे, हे सिद्ध केलेल्या अखिल भारतीय कीर्तन संस्थेला यंदा ८० वर्षे पूर्ण होत असून, दादर येथील ही वास्तू स्वत:च एक इतिहास आहे.
संस्थेने आध्यात्मिकतेबरोबर सामाजिक प्रबोधनाची सांगड घातली असून, देश-विदेशात संस्थेचा लौकिक आहे. १९४०मध्ये श्रावण वद्य पंचमीला या संस्थेची स्थापना दादरमध्ये करण्यात आली. संस्थेचे आद्य संस्थापक शंकरराव ब. कुलकर्णी आणि हरि भक्ती परायण गो. ग. भोसेकर बुवा हे आहेत. श्रीमंत राजेसाहेब औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे पहिली कीर्तन परिषद भरवली आणि एका प्रस्तावानुसार अखिल भारतीय कीर्तन संस्था स्थापन होऊन तिचे कार्य केवळ दादर किंवा मुंबईपुरते नव्हे महाराष्ट्र पातळीवर सुरू झाले.
सुरुवातीला संस्था एका बांबू-पत्र्याच्या तात्पुरत्या छपराखाली सुरू झाली. अखिल भारतीय कीर्तन संस्थेची १९४०मध्ये सार्वजनिक विश्वस्त संस्था म्हणून नोंदणी करण्यात आली. १९५८मध्ये विजयादशमीच्या दिवशी त्यावेळी विश्वस्त प्रमुख असलेले मंत्री डॉ. त्रिं. रा. नरवणे यांच्या हस्ते नवीन वास्तूसाठी भूमिपूजन करण्यात आले. वास्तू निर्माण झाल्यावर १९६०मध्ये श्रीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उद्योगपती वामनराव लक्ष्मणराव डहाणूकर यांच्या हस्ते झाली. ह.भ.प. भोसेकर, मारुलकर, महाजन गुरुजी, प्रकाशकर शास्त्री, वझे, रा. भागवत यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य मोठ्या जिद्दीने आणि तळमळीने केले. संगीताची बाजू देवधर गुरुजी आणि ग. बा. साधले यांनी समर्थपणे सांभाळली होती.
संस्थेच्या कायम वास्तूची उभारणी १९६०मध्ये झाली. १९९०-१९९४ दरम्यान संस्थेने कीर्तनाच्या पूर्वरंग आणि आख्यानाचे कीर्तन रत्नावली भाग १ व २ डॉ. ग. शि. पाटणकर यांच्या संपादनाखाली छापून प्रसिद्ध केले. त्यांच्या चार आवृत्ती निघाल्या. २०००मध्ये संस्थेच्या वास्तूचे पुनर्निर्माण आणि विस्तार कार्य तत्कालीन अध्यक्ष सुरेश उपाध्ये आणि सरकार्यवाह किशोर साठे यांच्या प्रयत्नाने साकारले गेले. २००१ मध्ये कीर्तन विद्यालयाचे नामकरण साई सत्चरित्रकार हेमाडपंत कीर्तन विद्यालय असे करण्यात आले.
घरबसल्या कीर्तनकार व्हा, असा कीर्तन शिकविण्याचा अभिनव
उपक्रम सुरू
आहे. तीन
वर्षांत कीर्तनकार व्हा, हा
संस्थेचा
मुख्य कार्यक्रम आहे. कोरोनामुळे कीर्तनाचे
आता आॅनलाइन वर्ग सुरू
आहेत. संस्थेचे संकेतस्थळ www.keertansanstha.in