Join us

किरीट सोमय्या मुंबईहून कोल्हापूरला रवाना; मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवारांवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 20:44 IST

किरीट सोमय्यांना सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांनी काही वेळ अडवलं; अखेर सोमय्या कोल्हापुरला रवाना

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या कोल्हापूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. सोमय्यांनी कोल्हापूरात येऊ नये अशी नोटीस तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली आहे. सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेस पकडण्यासाठी सीएसएमटीला आले असताना मुंबई पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये तुमच्या जीवाला धोका आहे, असं म्हणत पोलिसांनी सोमय्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सोमय्या कोल्हापूरला जाण्यावर ठाम होते. अखेर ते महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये बसले. कोल्हापूरकडे रवाना होत असताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

आज सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? कोल्हापूरच्या वेशीवर रोखा, असं म्हणत सोमय्यांनी पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मला कोल्हापूरपर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही. ठाकरेंचे पोलीस मला पुन्हा मध्येच रोखतील आणि ट्रेनमधून खाली उतरवतील, असा दावा त्यांनी केला."दिल्लीत मुजरा करू देत नाहीत म्हणून सोमय्यांचा गल्लीत गोंधळ, ही नौटंकी मनोरंजक’’, काँग्रेस नेते सचिन सावंत यांची बोचरी टीका 

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांचा एक घोटाळा मी बाहेर काढला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात जावं लागलं. आता दुसरा घोटाळा उघडकीस आणेन आणि तिसरा घोटाळा समोर आल्यावर त्यांना तुरुंगात जावं लागेल. मुश्रिफ यांचे घोटाळे उजेडात आणू नये यासाठीच महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मी जर कोल्हापूरला पोहोचलो, तर मुश्रिफ यांना तुरुंगात जावं लागेल याची कल्पना मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची आहे. त्यामुळेच मला रोखण्यासाठी ताकद वापरली जात आहे, असं सोमय्या म्हणाले. मला रोखण्यासाठी ठाकरे आणि पवार कारस्थान करत असल्याचं गंभीर आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :किरीट सोमय्याउद्धव ठाकरेशरद पवार