Join us  

Kiran Mane : स्टार प्रवाह वाहिनीचं स्पष्टीकरण, किरण मानेंना काढण्याचं हे आहे खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 5:23 PM

स्टार प्रवाह वाहिनीने परिपत्रक काढून किरण माने यांचं महिला कलाकारांसमवेतचं वर्तन योग्य नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच, किरण मानेंच्या राजकीय भूमिकेवरुन त्यांना काढले नसल्याचेही स्पष्टीकरण दिलंय

मुंबई - 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'मुलगी झाली हो' या लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आल्यानंतर राज्यभर वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियातून अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, आता स्टार प्रवाह वाहिनीनं किरण मानेंबद्दल स्पष्टीकर दिलं आहे. वाहिनीने एक परिपत्रक काढून आपली बाजू मांडली. 

स्टार प्रवाह वाहिनीने परिपत्रक काढून किरण माने यांचं महिला कलाकारांसमवेतचं वर्तन योग्य नसल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. तसेच, किरण मानेंच्या राजकीय भूमिकेवरुन त्यांना काढले नसल्याचेही स्पष्टीकरण दिलंय. ''किरण माने यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आणि काल्पनिक आहेत. असे आरोप होणे ही दुर्दैवी बाब आहे. माने यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय मालिकेमधील अनेक सह-कलाकारांसह, विशेषतः महिला नायिकांशी केलेल्या गैरवर्तनामुळे घेण्यात आला. त्यांच्या सहकलाकार, दिग्दर्शक आणि शोच्या इतर युनिट सदस्यांनी त्यांच्या सततच्या अनादरपूर्ण आणि आक्षेपार्ह वागणुकीविरुद्ध अनेक तक्रारी केल्या होत्या. माने यांना अनेकवेळा ताकीद देऊनही त्यांनी शालीनता आणि शिष्टाचाराचा भंग करत त्याच पद्धतीने वागणे सुरू ठेवले. त्यामुळे त्यांना मालिकेमधून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.'', असे वाहिनीच्या परिपत्रकात म्हटले आहे. 

''आम्ही सर्व मतांचा आणि मतांचा आदर करतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, आम्ही आमच्या कलाकारांसाठी विशेषतः महिलांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण सुनिश्चित करण्यासाठीही तितकेच वचनबद्ध आहोत.", असेही स्टार प्रवाहने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे. 

शर्वाणी पिल्लई काय म्हणतात

“मुळात राजकीय भूमिका किरण माने यांनी मांडली म्हणून, त्यांना या मालिकेतून काढून टाकलं, ही जे काही त्यांनी स्वत;हून पसरवले आहे,ही बाब मुळात खोटी आहे.मुळात त्यांच्या वर्तवणुकीमुळे प्रोडक्शन हाऊसने त्यांना ह्या मालिकेतून काढले आहे. किरण माने सांगत आहेत की, त्यांना याबाबत काही माहीती नाही मात्र, असे काही नाही. त्यांना यापूर्वी तीन वेळा वॉर्न करण्यात आले आहे. त्यानंतरच चौथ्या वेळी प्रोडक्शन हाऊसने हा निर्णय घेतला आहे”, असे आरोप किरण माने म्हणजेच विलास पाटील यांच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या उमा विलास पाटील (शर्वाणी पिल्लई) यांनी केले आहेत.

योग्यवेळी मनसे भूमिका घेईल - खोपकर

"मला यावर काहीही बोलायचं नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिला आहे. त्यांच्या वर्तवणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं. किरण यांचा आरोप आहे की, मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केलं गेलं. यावर कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भूमिका मांडेल" असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :किरण मानेमहिलामुंबईराष्ट्रवादी काँग्रेस