Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुंबईचा राजा' यंदा २२ फुटांचा, सूर्यमंदिरात होणार विराजमान

By पूनम अपराज | Updated: July 27, 2018 18:41 IST

गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर मूर्ती घडविण्याचे काम सुरु

मुंबई - गणेशोत्सव काही महिन्यांवर आला असून गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आज लालबागमधील प्रसिद्ध अशा गणेशगल्लीच्या म्हणजेच मुंबईचा राजा असा मान मिळविलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा दुपारपासून सुरु झाला आहे. पाद्यपूजनाच्या धार्मिक विधी पूर्ण झाल्या असून आता ढोल ताश्या पथकांचा जल्लोष गणेशगल्लीत साजरा केला जाणार असल्याची लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सरचिटणीस  स्वप्नील परब यांनी दिली. 

यंदा या मंडळाचे ९१ वे वर्ष असून उंच मूर्ती आणि भव्यदिव्य देखाव्यासाठी गणेशगल्लीचा बाप्पा पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागते. ह्यावर्षी या मंडळाकडे भाविकांकडून आलेल्या मागणीनुसार बाप्पाची उभी आकर्षक अशी २२ फुटी मूर्ती घडविण्याचे काम आजपासून सुरु झाले आहे. मूर्तिकार सतीश वळवडीकर हे हि भव्यदिव्य गणरायाची मूर्ती साकारणार आहेत. गणेशगल्लीत आकर्षण असते ते अतिशय सुंदर अश्या देखाव्याचे. १९२८ साली स्थापना झालेल्या या मंडळाने भारतातील विविध मंदिर साकारलेली आहे. मीनाक्षी मंदिर, त्रिपुरम सुवर्ण मंदिर, बद्रीनाथ, केदारनाथ, पशुपतीनाथ, स्वामीनारायण, सोमनाथ अशी भव्य मंदिरं आणि हवामहाल आदी देखावे या मंडळाने साकारलेली आहेत. यंदा मुंबईचा राजा मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेरच्या सूर्य मंदिरात विराजमान होणार आहे. सूर्य मंदिर हे नवग्रह मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या मंदिराची प्रतिकृती यंदा मंडळातर्फे साकारण्यात येणार असल्याची माहिती परब यांनी दिली. हा देखावा कलादिग्दर्शक अमन विदाते साकारणार असून जे भाविक त्या ठिकाणी जाऊन मंदिरे पाहू शकत नाहीत. त्यांच्यासाठी प्रतिकृती आम्ही साकारतो. जेणेकरून मुंबईतच त्यांना भारताच्या विविध भागात असलेल्या धार्मिक स्थळांचे दर्शन होईल असे परब यांनी पुढे सांगितले. 

   

टॅग्स :मुंबईगणेशोत्सवमहाराष्ट्र