भाऊ लक्ष देत नाही म्हणून पुतण्याची हत्या, वडाळ्यातील धक्कादायक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 01:12 IST2017-09-24T01:12:01+5:302017-09-24T01:12:18+5:30

मोठा भाऊ लक्ष देत नाही, म्हणून त्याला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या लाडक्या पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती, वडाळ्यातील तौसिफ नौशाद शेखच्या हत्याप्रकरणातून उघड झाली.

The killing of Pushta, the shocking incident in Wadala, as the brothers do not pay attention | भाऊ लक्ष देत नाही म्हणून पुतण्याची हत्या, वडाळ्यातील धक्कादायक घटना

भाऊ लक्ष देत नाही म्हणून पुतण्याची हत्या, वडाळ्यातील धक्कादायक घटना

मुंबई : मोठा भाऊ लक्ष देत नाही, म्हणून त्याला अद्दल घडविण्यासाठी त्याच्या लाडक्या पाच वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती, वडाळ्यातील तौसिफ नौशाद शेखच्या हत्याप्रकरणातून उघड झाली. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने त्याचा चुलता वसीरउल्ला इश्तिफाक शेख (२३)ला बेड्या ठोकल्या आहेत.
गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, वयाच्या दहाव्या वर्षांपासून वसीरउल्ला हा तौसिफचे वडील नौशादसोबत राहायचा. नौशाद यांचा कारखाना आहे. याच कारखान्यात वसीरउल्ला काम करायचा. त्याचे नुकतेच लग्न झाले. त्याची पत्नी गावी राहण्यास गेली. अशात गेल्या काही दिवसांपासून नौशाद आपल्याकडे लक्ष देत नसल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. अन्य कामगारांप्रमाणे आपल्यालाही वागणूक देत, कामाचा योग्य मोबदलाही देत नसल्याच्या भावनेने वसीरउल्लाचा राग नौशादवर वाढत होता, तसेच तौसिफवर नौशादचा जीव होता. तो त्याची जास्त काळजी घ्यायचा. त्यामुळेच मोठ्या भावाला अद्दल घडविण्यासाठी त्याने त्याच्या मुलाच्या हत्येचा डाव आखला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, घराबाहेर खेळत असलेल्या तौसिफला फिरण्याच्या बहाण्याने बाहेर नेले आणि शांतिनगर येथील खाडीलगत असलेल्या भागात त्याची गळा दाबून हत्या केली. त्याचा मृतदेह तेथेच सोडून तो पुन्हा घरी आला.

गुन्ह्याची कबुली
तौसिफची मिसिंग तक्रार देण्यासाठी त्याने नौशादसोबत पोलीस ठाणे गाठले. मात्र, पोलिसांनी २४ तास झाले नसल्यामुळे तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर, रात्रभर तो नौशादसोबतच तौसिफचा शोध घेण्याचे नाटक करत होता. शुक्रवारी रात्री उशिराने त्याला पोलिसी खाक्या दाखविताच, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

Web Title: The killing of Pushta, the shocking incident in Wadala, as the brothers do not pay attention