Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधाच्या वादातून प्रेयसीच्या मुलीचे अपहरण; एक्स्प्रेसच्या शौचालयातून एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 06:57 IST

रोतीन घोष (३५) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. 

मुंबई : पतीला तलाक दे म्हणत, प्रियकराने प्रेयसीच्या पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार नागपाडा परिसरात घडला. पोलिसांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग सुरू केला. स्टेशन आले की तो एक्स्प्रेसच्या बाथरूममध्ये लपायचा. अखेर, शेगाव येथे शालिमार एक्स्प्रेस पोहचताच त्याला शौचालयातून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. रोतीन घोष (३५) असे आरोपीचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. 

नागपाडा परिसरात २८ वर्षीय तक्रारदार राहण्यास आहे. ५ सप्टेंबर रोजी प्रियकर रोतीन घोष (३५) त्यांच्या पाच वर्षाच्या मुलीला घेऊन पसार झाल्याचे समजताच, रात्री उशिराने त्यांनी तात्काळ नागपाडा पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला. नागपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तांत्रिक तपासात आरोपी नाशिकमध्ये असल्याचे समजले. पुढे तो लोकमान्य टिळक टर्मिनस येथून शालिमार एक्स्प्रेसने गेल्याची माहिती हाती लागली. पथकाने हाच धागा पकडत, पाठलाग सुरू केला. आरोपी शौचालयात लपत असल्याच्या शक्यतेतून त्यांनी, गाडी शेगाव येथे पोहोचताच शौचालयात शोध घेतला. तेव्हा, लपून बसल्याचे दिसून आला. 

मुलगी पुन्हा आईच्या कुशीतपोलिसांनी मुलीची सुखरूप सुटका करत, आरोपीला ताब्यात घेतले. मुलीला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मुलगी पुन्हा सुखरूप कुशीत आल्याने आईनेही सुटकेचा नि:श्वास टाकला. नागपाडा पोलिसांनी आरोपीला अटक करत अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई