खुल जा सिम सिम

By Admin | Updated: May 16, 2014 01:02 IST2014-05-16T01:02:35+5:302014-05-16T01:02:35+5:30

सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागणार आहे.

Khul ja sim sim | खुल जा सिम सिम

खुल जा सिम सिम

मुंबई : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल शुक्रवारी लागणार आहे. यासाठी मुंबई शहर आणि उपनगरांतील चारही मतमोजणी केंद्र मतमोजणीसाठी सज्ज झाली आहेत. मतमोजणी केंद्रांना छावणीचे स्वरूूप आले असून, विजयाची खात्री असणार्‍या लोकसभा उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांनाही मतमोजणी केंद्रांवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मतदान यंत्रात बंद असलेल्या सर्व उमेदवरांच्या नशिबाचा फैसला आज होणार आहे. या मशिनमधून नेमके काय बाहेर पडते ते पाहण्यासाठी खुल जा सिम सिम असेच पाहण्याची अवस्था उमेदवारांची झाली आहे. उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी गोरेगाव येथील मुंबई एक्झिबिशन सेंटर येथे होणार आहे. उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी येथील हॉल क्रमांक ७ मध्ये होणार आहे. उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी हॉल क्रमांक ३ मध्ये होणार आहे. उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी विक्रोळी पूर्व येथील उदयांचल प्राथमिक शाळा येथे होणार आहे. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी एलफिन्स्टन महाविद्यालय आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात होणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांंंतील या चारही मतमोजणी केंद्रांवर ५ पोलीस उपायुक्त, १४ सहपोलीस आयुक्त, ६७ पोलीस निरीक्षक, १८७ पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक, १ हजार ७२८ पोलीस अंमलदार, २२२ महिला अंमलदार आणि १२ एसआरपीएफ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शिवाय या चारही मतमोजणी केंद्रावरील ईव्हीएम मशिन्स ‘स्ट्रॉंग रुम’मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी निवडणूक अधिकारी आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समक्ष त्याचे सील काढून ते सुरक्षित असल्याची खातरजमा केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात सकाळी ८ वाजता चारही मतमोजणी केंद्रावर मतमोजणीस सुरुवात होईल. एकंदर मुंबई शहर आणि उपनगरांतील चारही मतमोजणी केंद्रांंवर मतमोजणीसाठी दिमाखदार असा शामियानाच उभारण्यात आला आहे. कोणतीही विपरीत घटना होऊ नये म्हणून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. शिवाय, पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटाही तैनात ठेवण्यात आला असून सर्वच मुंबईकरांचे डोळे उद्याच्या निकालावर लागले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Khul ja sim sim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.