खारकोपर लोकलचा दिवाळी मुहूर्त हुकणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 00:44 IST2018-11-03T00:44:29+5:302018-11-03T00:44:51+5:30
अहवाल सुपूर्द करायला किमान ७ दिवस लागणार

खारकोपर लोकलचा दिवाळी मुहूर्त हुकणार?
मुंबई : नेरूळ-उरण मार्गावरील प्रवाशांना खारकोपरपर्यंत लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. नुकतीच रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) ए. के. जैन यांनी खारकोपरपर्यंतच्या रुळांची चाचणी केली. चाचणी यशस्वी झाली असली, तरी अहवाल सुपुर्द करायला वेळ लागणार आहे. यामुळे मध्य रेल्वेकडून चर्चेत असलेला दिवाळीचा ४ नोव्हेंबरचा मुहूर्त हुकणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
रेल्वेवरील कोणताही नवीन मार्ग अथवा विभाग प्रवाशांसाठी खुला करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी असणे अत्यावश्यक आहे. यानुसार नेरूळ-उरण मार्गावरील खारकोपरपर्यंतची चाचणी मंगळवारी पार पडली. या चाचणीच्या अहवालासाठी किमान ७ दिवसांचा काळ अपेक्षित आहे. प्रत्यक्ष लोकल केव्हा सुरू करणार? किती फेऱ्या सुरू करणार? याबाबत निर्णय मध्य रेल्वे घेणार असल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त ए. के. जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नोव्हेंबरअखेर सेवा सुरू होणार!
खारकोपरपर्यंत लोकल विस्तारीकरणाच्या लोकार्पणाबाबत मध्य रेल्वेच्या अधिकृत सूत्रांशी संपर्क साधला असता, खारकोपरपर्यंत सीआरएस चाचणी यशस्वी झाली आहे. मात्र, काही अंशी बदल सीआरएसने सुचविले आहेत. त्यामुळे ४ नोव्हेंबरला खारकोपरपर्यंत लोकल धावणार नसून नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.