खारघरचे प्रकल्पग्रस्त तरुण संघटित
By Admin | Updated: June 14, 2015 01:50 IST2015-06-14T01:50:41+5:302015-06-14T01:50:41+5:30
सिडकोने गरजेपोटी घरांवर कारवाईचा बडगा उचलल्यापासून सिडकोविरोधातील संतापाची ठिणगी गावागावांपर्यंत पोहोचली आहे.

खारघरचे प्रकल्पग्रस्त तरुण संघटित
पनवेल : सिडकोने गरजेपोटी घरांवर कारवाईचा बडगा उचलल्यापासून सिडकोविरोधातील संतापाची ठिणगी गावागावांपर्यंत पोहोचली आहे. सिडकोविरोधात छेडलेल्या आंदोलनाला यश आल्यानंतर नवी मुंबईमधील प्रत्येक गावातील तरुण एकत्र येत असून, आपल्या मागण्या सिडकोकडून मान्य करून घेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. यासाठी साम, दाम, दंड, भेदची नीती वापरण्यात येणार असून शुक्रवारी खारघर येथील खुटुकबांधन गावात झालेल्या बैठकीत शेकडो तरुणांनी सहभाग घेतला.
कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिवउद्योग सेनेचे तालुका अध्यक्ष वासुदेव घरत यांच्या खुटुकबांधन गावातील निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी म्हात्रे यांनी तरुणांना मार्गदर्शन करीत खारघरमधील १० गावांतील तरुणांनी आपल्या मागण्या सिडकोकडून मान्य करून घेण्यासाठी संघटित होऊन लढा देण्याची गरज असल्याचे सांगितले. सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांवर हातोडा मारण्याचा निर्णय घेतल्यानंतर नुकतीच गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत ५०० तरुणांची फौज तयार करण्यात आली आहे.
सिडकोच्या या जुलमी कारवाईला विरोध करण्यासाठी हे तरुण एकत्र आले आहेत. प्रकल्पग्रस्तांवरील अन्याय थांबला नाही तर वेळ पडल्यास
सिडको अधिकाऱ्यांशी दोन हात करण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे.
खारघर येथे झालेल्या बैठकीत फक्त गरजेपोटी घरांवर कारवाईला विरोध न करता सिडकोने दिलेली आजवरची आश्वासने, त्याची पूर्तता, गावांसाठी मैदाने, सामाजिक
भूखंड, लग्नकार्यासाठी समाज मंदिरे, प्रकल्पग्रस्तांच्या शिक्षणासाठी सिडकोची भूमिका, १२.५ टक्के भूखंडाचे वाटप, तसेच बाराबलुतेदार यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
या वेळी तरुणांनी कामगार नेते श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली खारघर प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती स्थापन करून आजूबाजूच्या गावातील
तरुणांमध्ये सिडकोच्या अन्यायाविरोधात जागरूकता निर्माण करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर जोशी,
शिवउद्योग सेनेचे वासुदेव घरत, ओवे ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ चौधरी आदींसह शेकडो तरुणांचा सहभाग होता. (प्रतिनिधी)