Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘इंडिया’चे संयोजक खरगे की पवार? मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता; लोगोचे आज अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 06:52 IST

 इंडिया आघाडी होऊन काही महिने झाले असले तरी संयोजकांच्या नावावर एकमत होऊन त्यांची घोषणा होऊ शकलेली नाही.

मुंबई : इंडिया आघाडीच्या मुंबईत आजपासून दोन दिवस होणाऱ्या बैठकीत या आघाडीच्या संयोजकांचे नाव निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव आघाडीवर असले तरी ऐनवेळी काही नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समोर येऊ शकते. 

 इंडिया आघाडी होऊन काही महिने झाले असले तरी संयोजकांच्या नावावर एकमत होऊन त्यांची घोषणा होऊ शकलेली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव सुरुवातीला आले पण काही घटक पक्षांनी त्याला आक्षेप घेतला, अशी माहिती आहे. या आघाडीचे संयोजक हे पंतप्रधानपदाचे आघाडीचे उमेदवार असतील असे सुरुवातीला चर्चेत आल्याने संयोजक ठरविण्यात अधिक अडचणी आल्या होत्या. जे संयोजक असतील तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले तर त्यांच्या नेतृत्वात सगळे पक्ष निवडणुकीला सामोरे जातील हे लक्षात आल्यावर काही प्रादेशिक पक्षांनी विशिष्ट नेत्यांच्या नावाला विरोध सुरू  केला. 

इंडिया आघाडीतील काही ज्येष्ठ नेत्यांनी हे स्पष्ट केले, की इंडिया आघाडीचे संयोजक म्हणजे पंतप्रधान पदाचे उमेदवार, असे अजिबात नाही. आघाडीतील सर्व पक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी एवढ्यापुरतेच या पदाचे महत्त्व असेल. 

पवार न्याय देऊ शकतील?या आघाडीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्याच्याकडेच संयोजक पद द्यावे म्हणजे आघाडीचे संतुलन साधले जाईल, असा तर्कही दिला जात आहे.  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्याकडून शरद पवार यांना संयोजक पद देण्याची मागणी केली जाऊ शकते. स्वत:च्या पक्षातील मोठ्या फुटीला सामोरे जात असलेले शरद पवार सध्या पुतणे अजित पवार यांनी दिलेल्या धक्क्यातून सावरत पक्षबांधणी नव्याने करत आहेत. अशावेळी ते आघाडीच्या संयोजक पदाला न्याय देऊ शकतील का, हा मुद्दाही समोर येऊ शकतो. सर्व भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बराच पुढाकार घेतला होता. तथापि इंडिया आघाडीचे संयोजक पद स्वीकारण्यास त्यांनी स्वत:च नकार दिला आहे.मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव समोर आले आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. सर्व पक्षांना सांभाळून घेत पुढे जाण्याची भूमिका घेऊ शकतात. आघाडीतील अनेक नेत्यांशी त्यांचे वैयक्तिक स्नेहाचे संबंध आहेत. 

लोगोबाबत नेत्यांची गुप्तताआता ‘इंडिया’चा खास लोगोही तयार करण्यात आला आहे. परंतु, लोगोबाबत ‘इंडिया’तील नेत्यांनी प्रचंड गुप्तता पाळली आहे. हा लोगो कसा असेल, याबाबत हे नेते सांगायला तयार नाहीत. या लोगोत देशाचा रंग असेल असे ‘इंडिया’चे नेते सांगत आहेत. या लोगोमध्ये तिरंग्याची झलक असू शकते. 

टॅग्स :इंडिया आघाडीशरद पवारमल्लिकार्जुन खर्गे