Join us  

'नाथाभाऊंचा निर्णय त्यांच्यासाठीच अत्यंत दुर्दैवी, आता दिल्या घरी सुखी राहावं'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 2:03 PM

मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती

ठळक मुद्देमुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे. त्यानंतर, भाजपाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी खडसेंचा हा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. 

मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. एकनाथ खडसे हे गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक मानले जातात, परंतु मुंडे यांच्या निधनानंतर कालांतराने एकनाथ खडसेंना भाजपात डावलण्यात आलं होतं. एकनाथ खडसे यांनी राज्याच्या विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद भूषवले होते. तसेच फडणवीस सरकारमध्ये त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. आता, राष्ट्रवादीत खडसेंना कोणती जबाबदारी मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

राष्ट्रवादीत प्रवेशाचा एकनाथ खडसेंचा निर्णय त्यांच्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, ज्या पक्षात त्यांचं राजकीय करिअर घडलं. बाजार समितीपासून ते महसूल मंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली होती. तो पक्ष खडसेंनी सोडून जायला नव्हते पाहिजे, असे रावसाहेब दानवेंनी म्हटलंय. नाथाभाऊंबद्दल पक्षातील कुणाच्याही मनात दुमत नाही. नाथाभाऊंना पक्षाकडून नक्कीच उभारणी मिळाली असती, पण त्यासाठी काही काळ जाणं महत्त्वाचं असंत. काही न्यायालयीन बाबींची पूर्तता होणं गरजेचं होत. नाथाभाऊ आणचे चांगले मित्र आहेत. पण, आता जिथे गेलेत, तिथं त्यांनी सुखी राहावे, असेही रावासाहेब दानवेंनी म्हटले आहे. 

सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर भाजपाकडून सुधीर मुनगंटीवार यांनी पहिली प्रतिक्रिया देताना, वो जाने वाले हो सके तो लौट के आना.. असे म्हटले आहे. मनाविरुद्ध घडत असतानाही काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजनांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय. पण, एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रवेश ही धक्कादायक बातमी आहे. तसेच पक्षासाठी चिंतनाची बाब आहे, असं मला वाटतं. पक्षाला खडसेंसारखा नेता, ज्यांनी 40 वर्षे पक्षांची सेवा केले ते आज राष्ट्रवादाचा बुरखा पांघरलेल्या राष्ट्रवादीत जात आहेत, हे धक्कादायक आहे. मीही त्यांच्या नेतृत्वात काम केलंय. त्यामुळे, एकनाथ खडसेंना मी एवढचं म्हणू शकतो, ओ जानेवाले हो सके तो लौट के आना.. असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिलीय. 

टॅग्स :एकनाथ खडसेरावसाहेब दानवेराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा