KEM resident doctor commits suicide | केईएमच्या निवासी डॉक्टरची वैफल्यातून आत्महत्या

केईएमच्या निवासी डॉक्टरची वैफल्यातून आत्महत्या

मुंबई : महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी प्रणय राजकुमार जयस्वाल (२७) यांचा मृतदेह शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या गच्चीवर आढळून आला. त्यांनी अपायकारक औषध घेऊन आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक कारणामुळे ते वैफल्यग्रस्त होते. त्याच नैराश्येतून त्यांनी हे कृत्य केले असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रणय हे मूळचे अमरावती येथील असून, त्यांचे पालक मुंबईत पोहोचल्यावर शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. या आत्महत्येची नोंद भोईवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

प्रणय जयस्वाल हे केईएममध्ये वरिष्ठ निवासी शल्यविशारद म्हणून गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत होते. त्यांचे ‘मास्टर ऑफ सर्जरी’चे (एमएस) अंतिम वर्ष सुरू होते. शनिवारी सकाळी रुग्णालयाच्या गच्चीवर ते मृतावस्थेत आढळून आले. सहकाऱ्यांनी त्याबाबत विभागप्रमुखांना कळविल्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. इंजेक्शनमधून त्यांनी औषध घेतले असल्याची शक्यता आहे. त्याचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

प्रणय यांच्याजवळ खोलीत कसलीही चिठ्ठी मिळालेली नाही. त्यांचे रूम पार्टनर डॉ. समर्थ पटेल यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, प्रणय हे गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक कारणामुळे वैफल्यग्रस्त होते. कोणाशी फारसे बोलत नव्हते. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकाच खोलीत राहात होते. त्यांच्यासह प्रणय यांच्या अन्य सहकारी, मित्रमंडळींकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रवक्ते उपायुक्त (अभियान) प्रणव अशोक यांनी सांगितले.

अमरावती येथील रविनगर परिसरातील मूळ रहिवासी असलेले डॉ. प्रणय यांचे पार्थिव रविवारी येथे आणले जाईल. शनिवारी त्यांच्या निवासस्थानी नातेवाइकांनी गर्दी केली होती. त्यांचे वडील डॉ. राजकुमार जयस्वाल हे ३० वर्षांपासून रविनगर परिसरात राहतात. डॉ. राजकुमार यांच्या कुटुंबात पत्नी ममता, मुलगा प्रणय व मुलगी पूजा यांचा समावेश होता. प्रणय यांनी सामरा स्कूलमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेतले. सहा वर्षांपासून ते मुंबईत वैद्यकीय शिक्षण घेत होते. प्रणय यांनी आत्महत्येपूर्वी स्वत:च्या फेसबुकवरील डेटा डीलीट केल्याची माहिती त्यांच्या मित्रांनी दिली.
पोलिसांकडून तपास सुरू झाल्यानंतर मोबाइल लोकेशन ट्रेस केल्यावर डॉ. जयस्वाल हे निवासी वैद्यकीय अधिकारी वसाहतीच्या गच्चीवर असल्याचे समजले. एमएसचे शिक्षण घेतल्यानंतर आपला बॉण्ड पूर्ण करून एसएमओ म्हणून ते केईएममध्ये होते. त्यांच्या हाताला इंजेक्शन टोचल्याची खूण असल्याने प्राथमिक अंदाजानुसार ही आत्महत्या असल्याचे वाटते आहे. मात्र पोलीस तपासात नक्की कारण समोर येईल, असे अधिष्ठाता हेमंत देशमुख यांनी सांगितले.

डॉ. प्रणय सकाळपर्यंत रूममध्ये न आल्याने आम्ही त्यांच्या घरच्यांशी आणि पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर शिरोडकर हायस्कूलमध्ये त्यांचे लोकेशन दाखवत होते. मात्र ते टॉवर लोकेशन असल्याने रुग्णालयात सर्व ठिकाणी तपास सुरू करण्यात आला.
- डॉ. रमेश भारमल, पालिका रुग्णालयांचे संचालक

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: KEM resident doctor commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.