Join us
Daily Top 2Weekly Top 5

वित्तीय संस्थांच्या कारभारावर लक्ष ठेवा, गृह विभागाची पोलिसांंना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 20:02 IST

राज्यातील विविध लहान,मोठ्या वित्तीय संस्थांच्या कारभार, त्यांच्याकडून ग्राहकांसाठी दाखविणा-या आकर्षक व्याज, परतावाबाबतच्या प्रलोभनात्मक जाहिरातीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कारवाई करावी...

मुंबई - राज्यातील विविध लहान,मोठ्या वित्तीय संस्थांच्या कारभार, त्यांच्याकडून ग्राहकांसाठी दाखविणा-या आकर्षक व्याज, परतावाबाबतच्या प्रलोभनात्मक जाहिरातीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कारवाई करावी, अशी सूचना गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली आहे. विविध जिल्ह्यातील ठेवीदार कंपन्यांच्या फसवणूकीपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, यासाठी त्याबाबत कसल्याही तक्रारीशिवाय कार्यवाही करण्यास सांगण्यात आल्याचे विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.अनेक कंपन्या या नागरिकांना अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून, आकर्षक व्याज, लाभांश, फायदा किंवा अन्य स्वरुपांचे फायदे देण्याचे दाखवून ठेवी स्विकारतात. मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांना त्याचा काहीही लाभ तसेच गुंतवणूक न देता फसवणूक करीत असल्याचे अनेक गुन्हे घडले आहेत. अशा प्रकारे राज्यातील हजारो नागरिकांची विविध लहान,मोठ्या वित्तीय संस्थांकडून फसवणूक झालेली आहे. त्यावर प्रतिबंधासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ च्या कलम ४(१)(दोन) अन्वये कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आलेले आहेत. मात्र अनेकवेळा पोलीस हे संबंधितांकडून तक्रार आल्याशिवाय त्याबाबत गुुंतवणूकदार कंपनीवर कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, परिणामी फसवणूक होणा-यांची संख्या वाढत जात असल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक पोलीस घटकातील आयुक्त/ अधीक्षकांनी त्याबाबत योग्य कार्यवाही करावी, अशा कंपन्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी अधिका-यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी सूचना गृह विभागाकडून पोलीस महासंचालकांच्या मार्फत करण्यात आलेली आहे.

टॅग्स :भारतपोलिसमुंबई