काश्मीरच्या पर्यटनाला १५ दिवसांत ‘अच्छे दिन’; ‘ऑपरेशन सिंदूर’चा गर्वच; पर्यटन क्षेत्राकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 06:40 IST2025-05-08T06:40:11+5:302025-05-08T06:40:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर देशभरात सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे. पर्यटन ...

काश्मीरच्या पर्यटनाला १५ दिवसांत ‘अच्छे दिन’; ‘ऑपरेशन सिंदूर’चा गर्वच; पर्यटन क्षेत्राकडून स्वागत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर देशभरात सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे. पर्यटन क्षेत्रातील मान्यवरांनीही हा हल्ला म्हणजे अभिमानाचा व गर्वाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. काही विमानांच्या ‘टेक ऑफ’वर नियंत्रण आल्याने पुढील १० दिवसांतील सहली रद्द केल्या आहेत. मात्र, १५ दिवसांनी स्थिती पूर्ववत झाल्यावर काश्मीरच्या पर्यटनाला ‘अच्छे दिन’ येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘महाराष्ट्र टूर ऑर्गनायझर्स असोसिएशन’चे अध्यक्ष विश्वजित पाटील यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल भारतीय म्हणून गर्व आहे. सध्या काश्मीरमधील पर्यटन क्षेत्र नाही म्हटले तरी विस्कळीत झाले आहे. आता सीमेजवळील म्हणजे श्रीनगर, जम्मू, चंडीगड, अमृतसर आणि अहमदाबाद विमानतळे बंद आहेत. आपल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून काय प्रतिक्रिया येते किंवा आणखी काही ऑपरेशन्स आहेत का? याबाबत आपण अनभिज्ञ असल्याने ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. हिमाचल प्रदेशमध्ये जाण्यापूर्वी पर्यटक सगळ्या गोष्टी तपासून पाहत आहेत. वैष्णोदेवी येथेही सारखीच परिस्थिती आहे.
‘सहलीपेक्षा देश महत्त्वाचा’
पर्यटन व्यावसायिक सतीश शाह यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत काश्मीरमधील पर्यटन वाढले होते. त्यामुळे तेथील स्थानिकांना रोजगार मिळाला होता.
पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ झाले. त्याचा प्रत्येक भारतीयाला आणि पर्यटन क्षेत्राला अभिमान आहे.
काश्मीरमधील हल्ल्यानंतर सहली रद्द होत होत्या. आता विमानतळे बंद असल्याने सहली रद्द होण्याचे प्रमाण वाढेल. आमच्यासाठी सहलीपेक्षा देश महत्त्वाचा आहे. आज दिलेल्या उत्तरानंतर काश्मीर आपले होते आणि आपलेच राहील, असा संदेश
दिला आहे.