Join us

अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:29 IST

काश्मीरवर दहशतवादी हल्ले झाले तरी पर्यटकांनी तिकडे जाणे थांबविलेले नाही. काश्मीरला जाण्याचा ओढा प्रचंड आहे.

मुंबई - पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटक काश्मीरकडे पाठ फिरवतील, अन्य पर्यटनस्थळांना अधिक पसंती मिळेल, अशा अटकळी बांधल्या जात असल्या तरी पर्यटन क्षेत्रातील जाणकारांचा कानोसा घेतला असता अजूनही पर्यटनासाठी पर्यटक काश्मीरला प्राधान्य देत असल्याचे निदर्शनास आले आहे. हल्ल्याचा परिणाम तात्पुरता असेल. आतापर्यंत १०० पैकी ३० जणांनी काश्मीरला जाण्याचा बेत रहित केलेला नाही, परंतु पुढे ढकलला आहे. येत्या १५ दिवसांत पुन्हा सर्व सुरळीत होईल, असा आशावाद जाणकार व्यक्त करत आहेत. 

वीणा वर्ल्डच्या संस्थापक वीणा पाटील यांनी सांगितले की, पहलगामच्या घटनेनंतर मंगळवारी तिकडे जाणारे पर्यटकांचे ग्रुप जाऊ शकले नाहीत. त्यामुळे पर्यटकांचे ग्रुप श्रीनगरमध्ये राहिले. पहलगाममध्ये असलेला एक ग्रुप बुधवारी सकाळी श्रीनगरमध्ये सुरक्षित पोहोचला. सध्या पहलगाममधील पर्यटन बंद आहे. आमचे श्रीनगरमध्ये बरेच ग्रुप आहेत. तेथील पर्यटन सुरळीत आहे. आम्ही प्रत्येक तासाला अपडेट घेत आहोत. गंडोला, शिकारा, सोनमर्गमधील पर्यटन सुरू असून, तेथे सगळीकडे सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

काश्मीरवर दहशतवादी हल्ले झाले तरी पर्यटकांनी तिकडे जाणे थांबविलेले नाही. काश्मीरला जाण्याचा ओढा प्रचंड आहे. बुधवारसह नंतरही तिकडे जाणाऱ्या पर्यटकांचा निर्णय आम्ही त्यांच्यावर सोपवला आहे. त्यांनी प्लॅन पुढे ढकलले तरी आम्ही त्यांना होकार देत असून, काही पर्यटक ट्रीप पुढे ढकलण्याचा निर्णय घेत आहेत. आजही दोन ते तीन टूर आमच्या काश्मीरला गेल्या. ट्रीप पुढे ढकलण्याचे प्रमाण शंभरात ३० टक्के असून, मे महिन्यांत पर्यटकांची पावले पुन्हा काश्मीरकडे वळतील. तर पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दिशा पटेल यांच्या म्हणण्यानुसार, काश्मीरच्या ट्रिप रद्द होणार नाहीत तर पुढे ढकलल्या जातील.

काही पर्यटकांनी ट्रीप रद्द करण्याची विनंती केली आहे. मात्र, आम्ही त्यांना दोन-तीन दिवस वाट पाहण्यास सांगितले आहे. बुधवारीही अनेक पर्यटक काश्मीरला गेले. आमचे तेथील सर्व पर्यटक सुरक्षित आहेत.  -विश्वजित पाटील, संचालक, राजाराणी ट्रॅव्हल्स

टॅग्स :पहलगाम दहशतवादी हल्लादहशतवादी हल्लापर्यटन